LIVE UPDATES

विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक पाया भक्कम करण्याचे काम करावे

मान्यवरांचे प्रतिपादन : विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा संपन्न
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 20:33 PM
views 23  views

सावंतवाडी : विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक पाया भक्कम करण्याचे काम करावे. शाळांतील विविध स्पर्धात सहभागी होवून अष्टपैलू बनावे. शिक्षण घेत असताना आपल्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. शिक्षकांनी मुलांमधील गुणवत्ता ओळखून त्याला मार्ग दाखवला पाहिजे. करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असुन आपल्या कौशल्याच्या जोरावर आपले क्षेत्र निश्चित करावे असे प्रतिपादन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले.

कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते शेकडो विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. तब्बल 300 हून अधिक विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक व त्यांचे प्रतिनिधी, आदर्श शिक्षक यांचाही गौरव करण्यात आला. 

याप्रसंगी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ, स्टेपिंग ग्लोबल स्कूलचे संचालक ॲड. रूजूल पाटणकर, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विनी लेले, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, व्याख्याते प्रा. रूपेश पाटील, पत्रकार आनंद धोंड, माहिती अधिकार महासंघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुशील चौगुले, सामाजिक कार्यकर्ते प्रसन्न उर्फ बाळू देसाई, पर्यावरण संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्ष मानसी परब, डी. एस. जांभेकर आदी उपस्थित होते.  यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणाले, जीवनात आपण घडलं पाहिजे, मोबाईल मधून विद्यार्थी वगरान चांगलं घ्यावे. आज डिजिटल क्रांती झाली असून विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करायला हवा. मुलांनी स्वप्न पहावे,ते पुर्ण करण्यासाठी कष्ट करून सातत्य ठेवले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी मागे पडणार नाही. जिल्ह्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल भविष्य घडवतील. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने यश संपादन करण्यासाठी वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले, अवांतर वाचनाची आवड निर्माण करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करावे असे सांगितले. तर अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल म्हणाले, स्पर्धा परीक्षा साठी पालकांनी मानसिकता तयार करून अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असून त्यासाठी आम्ही निश्चित सहकार्य करू. विद्यार्थी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी शिक्षक व पालक मेहनत घेतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी जगात नांव निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, डॉ. अश्विनी लेले, प्रा. रूपेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिर्के यांनी तर सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी केले. आभार प्रथमेश सावंत यांनी मानले.