
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व सोयीस्कर व्हावा, यासाठी हरकुळखुर्द ग्राम उत्कर्ष मंडळाच्या सहकार्याने तसेच लोकसेवा समिती, डोंबिवलीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते गजानन गायकवाड यांच्या प्रयत्नातून गेल्या अनेक वर्षांपासून डोंबिवली- हरकुळखुर्द-कणकवली या मार्गावर एसटी बस बुकिंगचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
याही वर्षी गणेश भक्तांच्या सेवेसाठी शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता डोंबिवली रेल्वे स्टेशन पश्चिम येथून हरकुळखुर्द-कणकवलीच्या दिशेने एसटी बस रवाना करण्यात आली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, डोंबिवलीच्या नगरसेविका मनिषा धात्रक तसेच ग्रामस्थ आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल गजानन गायकवाड यांचे आभार मानले.
यावेळी विलास गुरव यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून गणपती बाप्पा व आई पावणादेवी मातेला सांगणे करण्यात आले. त्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व गणेश भक्तांना गौरी-गणपती सणाच्या शुभेच्छा देत त्यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर गणेश भक्तांना घेऊन एसटी बस गावच्या दिशेने मार्गस्थ झाली.
या उपक्रमामुळे मुंबई-डोंबिवली परिसरातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी थेट आपल्या गावात पोहोचण्याची सोय उपलब्ध झाली असून, गणेश भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.










