LIVE UPDATES

​स्वावलंबी नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थीदशेपासूनच हवी आर्थिक शिस्त : सहदेव परब

कर्ले महाविद्यालयात आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 19, 2026 13:45 PM
views 55  views

देवगड : डिजिटल व्यवहारांचे वाढते प्रमाण, बदलते आर्थिक व्यवहार आणि सायबर फसवणुकीचे वाढते प्रकार लक्षात घेता प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या साक्षर असणे ही काळाची गरज आहे. बचत, गुंतवणूक, विमा, बँकिंग व्यवहार, आर्थिक नियोजन आणि डिजिटल सुरक्षिततेचे ज्ञान विद्यार्थीदशेतच आत्मसात केल्यास भविष्यात सक्षम, स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक घडू शकतात, असे प्रतिपादन धान फाउंडेशनचे समन्वयक सहदेव परब यांनी केले.

शिरगांव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. आर्थिक साक्षरता केंद्र वेंगुर्ला यांच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमास रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले तर धान फाउंडेशनने कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली.

यावेळी सहदेव परब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बचतीची सवय, नियोजनबद्ध गुंतवणूक, विम्याचे महत्त्व, कर्जाचा जबाबदारीने वापर,मासिक अंदाजपत्रक तयार करण्याची पद्धत आणि आर्थिक शिस्त तसेच  डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे सायबरy गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत असल्याचे नमूद करत त्यांनी यूपीआय, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि ऑनलाइन पेमेंट करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत  सविस्तर मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी म्हणाले,आर्थिक व्यवहारांबाबत योग्य ज्ञान आणि जागरूकता हीच भविष्यातील आर्थिक यशाची गुरुकिल्ली आहे. उत्पन्न किती आहे यापेक्षा उपलब्ध उत्पन्नाचे योग्य नियोजन कसे केले पाहिजे यावर आर्थिक प्रगती अवलंबून असते असे सांगत त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने आर्थिक निर्णय घेताना माहितीपूर्ण आणि जबाबदार भूमिका घ्यावी असे आवाहन केले.

यावेळी विविध शासकीय आर्थिक योजना, ग्राहक संरक्षणाचे अधिकार, आर्थिक फसवणूक टाळण्यासाठीचे उपाय यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न उपस्थित केले. बचत गुंतवणुकीतील फरक, शैक्षणिक कर्ज, विमा संरक्षण, डिजिटल व्यवहारांतील सुरक्षितता आणि वैयक्तिक आर्थिक नियोजन यासंदर्भातील शंकांचे समाधान करण्यात आले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, प्राध्यापिका कोमल पाटील, सोनाली ताम्हणकर, प्राध्यापक आशय सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांनी केले. प्राध्यापिका सुगंधा पवार यांनी  आभार मानले 

कर्ले महाविद्यालयातील आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रमात धान फाउंडेशनचे समन्वयक सहदेव परब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.