
सावंतवाडी : माजगावचे जागृत देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उत्सवाचे औचित्य साधून भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी मंदिरात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले, श्री चरणी श्रीफळ अर्पण केले.
माजगावची श्री देवी सातेरी ही 'नवसाला पावणारी आई' आणि 'माहेरवाशिणींची पाठीराखी' म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. वार्षिक जत्रोत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी विशाल परब यांनी देवीची विधिवत पूजा करून संपूर्ण जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.या भेटीदरम्यान देवस्थान कमिटी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने विशाल परब यांचा शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. जत्रोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या जनसमुदायाशी त्यांनी संवाद साधला आणि उत्सवाच्या नियोजनाचे कौतुक केले. विशाल परब यांनी जत्रोत्सवासाठी आलेल्या स्थानिक ग्रामस्थांशी आणि भाविकांशी संवाद साधला. माजगावच्या या ऐतिहासिक उत्सवाचे नियोजन आणि परंपरेचे कौतुक करताना त्यांनी भाविकांना जत्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.











