खासकीलवाडा-शिल्पाग्राम परिसरात मध्यरात्रीनंतर एमएनजीएल कंपनीकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता खोदाई

पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनला तडा जाऊन हजारो लिटर पाणी वाया
Edited by:
Published on: May 02, 2026 14:49 PM
views 14  views

सावंतवाडी : शहरातील खासकीलवाडा - शिल्पाग्राम परिसरात मध्यरात्रीनंतर एमएनजीएल कंपनीकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता खोदाई करण्यात आली. या कामामुळे नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनला तडा जाऊन हजारो लिटर पाणी वाया गेले. ही घटना ऐन उन्हाळ्यात घडल्याने नागरिकांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे.

घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख स्थानिक नगरसेवक संजू परब व ठाकरे युवासेनेचे तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी करत प्रशासनाला खडेबोल सुनावले.

याबाबत नगरपालिकेकडे विचारणा केली असता या कामाबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती असा खुलासा प्रशासनाने केल्याचे सुभेदार यांनी सांगितले. यावेळी संजू परब यांनीही घटनास्थळी भेट देत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी सुभेदार यांनी एमएनजीएल कंपनीला इशारा देताना, यापुढे अशा प्रकारे रात्री अपरात्री बेकायदेशीर काम केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्याच खड्ड्यात रात्र दाखवू, असा इशारा दिला. एमएनजीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन बंद असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.