
कणकवली : गणेशोत्सव काळात कलमठ – आचरा या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी कलमठच्या जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांनी कणकवली पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, गणेशोत्सवाच्या निमित्ताने कणकवली, कलमठ, आचरा तसेच लगतच्या ग्रामीण भागांत लाखो चाकरमानी, भाविक दाखल होतात. कणकवली – कलमठ - आचरा हा रस्ता प्रमुख संपर्कमार्ग असल्याने या कालावधीत रस्त्यावर दुचाकी, चारचाकी गाड्या, एसटी बसेस आणि पादचाऱ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढते.
सदर रस्त्याची रुंदी बऱ्याच ठिकाणी मर्यादित असून कलमठ बाजारपेठ तसेच पुढील गावांमध्ये अनेक तीव्र वळणे व मानवी वस्ती आहे. अशा स्थितीत या मार्गावर अवजड वाहतूक सुरु राहिल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. अरुंद रस्त्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होऊन अवजड वाहने समोरासमोर आल्यास कित्येक तास वाहतूक ठप्प होते आणि चाकरमानी व स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होते.
भाविक, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची रस्त्यांवर मोठी गर्दी असल्याने अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढतो. या अनुषंगाने सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा यासाठी गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत अवजड वाहतुक बंद ठेवून सहकार्य करावे, असे मेस्त्री यांनी निवेदनात म्हटले आहे.










