
कुडाळ : माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना भात पिकाचा प्रोत्साहन बोनस मिळण्याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. शेतकऱ्यांना प्रोत्साहन बोनस तात्काळ मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांकडून यावर्षी भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे. भात हे या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून, त्यावरच अनेक शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. शासनाकडून भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी प्रोत्साहन बोनस/अनुदान देण्यात येते. मात्र, यावर्षी माणगाव खोऱ्यातील अनेक भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन बोनस अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भात उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, मजुरी, बियाणे, खते, औषधे तसेच इतर शेतीच्या खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारा प्रोत्साहन बोनस हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीनही अधिवेशनमध्ये जाहीरपणे सांगितले की शेतकऱ्यांना आम्ही भात प्रोत्साहन बोनस अनुदान देण्यासाठी तयार आहोत. याबाबत आपल्या स्तरावरून पत्र व्यवहार व्हावा हि विनंती. या बाबीची तातडीने दखल घेऊन माणगाव खोऱ्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षीचा प्रोत्साहन बोनस का मिळालेला नाही, याची माहिती घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा व पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन बोनस तात्काळ मिळवून द्यावा, बोनस मिळण्यास काही प्रशासकीय अथवा तांत्रिक अडचण असल्यास ती दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी ॲड. दिपक काणेकर, स्वप्नील म्हाडगुत, मिलिंद पालव, सचिन पालव आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.










