
सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोटपा-२००३' आणि 'एफसीटीसी ५.३' या विषयावरील जिल्हा व तालुका समन्वय समितीची एकदिवसीय कार्यशाळा सुरंगी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय येथे उत्साहात पार पडली. तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती आणि विविध विभागांमधील समन्वय अधिक बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या मान्यतेने आयोजित या कार्यशाळेस उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रीमती प्रतिभा वराळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत दावंगे तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.कार्यशाळेत मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक आप्पासाहेब उगले यांनी कोटपा-२००३ कायद्यातील कलम ४, ५, ६(अ), ६(ब), ७ आणि ८ यांची सविस्तर माहिती दिली. तसेच एफसीटीसी ५.३ (WHO Framework Convention on Tobacco Control) अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील समन्वय समित्यांची भूमिका, जबाबदाऱ्या आणि तंबाखू नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
यानंतर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते कार्मीस आल्मेडा यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची उद्दिष्टे, तंबाखूमुक्त शाळा अभियान आणि युवकांमध्ये तंबाखू सेवन रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा सल्लागार संतोष खानविलकर यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्त समाज घडविण्याची शपथ दिली.
यावेळी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी, १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री प्रतिबंधित करणे, शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्रीस बंदी तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरात व प्रचारावर बंदी या कोटपा कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी "धूम्रपान निषिद्ध" फलक अनिवार्यपणे लावावेत, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अदिती कशेळीकर यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सल्लागार संतोष खानविलकर, सामाजिक कार्यकर्ते कार्मीस आल्मेडा, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय व्यवस्थापक अनिल गुंजे, गणेश उगले, योगेश उगले तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या सर्व सदस्यांनी विशेष सहकार्य केले.










