LIVE UPDATES

हेत फाट्यावर टेम्पोसह आठ गुरे जप्त

दोघांवर गुन्हा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 10, 2026 18:45 PM
views 230  views

वैभववाडी : भुईबावडा घाटमार्गे टेम्पोतून बेकायदेशीररीत्या गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वैभववाडी पोलिसांनी हेत फाटा येथे सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत चार गायींसह एकूण आठ गुरे आणि सुमारे चार लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी  पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

  भुईबावडा घाटमार्गे गुरांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार गुरुवारी रात्रीपासून भुईबावडा-हेत फाटा परिसरात पाळत ठेवली होती.पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप कांबळे, रणजित सावंत, हरेष जायभाय आणि श्रीकांत कराळे यांच पथक कार्यरत होत. गुरुवारी पहाटे खारेपाटणच्या दिशेने येणारा टेम्पो(एमएच-०९-ईएन-०३८०) संशयावरून थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये चार गायींसह आठ गुरे कोंबून नेण्यात येत असल्याचे आढळून आले.टेम्पो चालक विवेक शामराव कांबळे (रा. निपाणी) व रूपेश लवू जाधव (रा. कोदवली, ता. राजापूर) यांच्याकडे चौकशी केली असता ही गुरे निपाणी-संकेश्वर येथे नेत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ही गुरे खारेपाटण येथील इम्रान लतीफ खान याच्याकडून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत गुरांसह टेम्पो वैभववाडी पोलीस ठाण्यात आणला. दोघांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा तसेच आवश्यक परवानगीशिवाय गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान सुमारे चार लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला असून, जप्त केलेली सर्व गुरे कुसूर येथील गोशाळेच्या ताब्यात देण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश भोवड करीत आहेत.