
वैभववाडी : “शासनाने स्वीकारलेल्या नव्या शैक्षणिक धोरणातील बारकावे समजून घेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाने इतर महाविद्यालयांसाठी आदर्श मॉडेल बनावे,” असे प्रतिपादन खासदार विनोद तावडे यांनी केले.
येथील शहीद मेजर कौस्तुभ रावराणे सभागृहात महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्यावतीने खासदार तावडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती सिद्धेश रावराणे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, उपसभापती साची कोलते, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद रावराणे, सज्जन रावराणे, अर्जुन रावराणे, प्रभानंद रावराणे, सुधीर नकाशे, भालचंद्र साठे, सत्यवान रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार तावडे पुढे म्हणाले, “मुंबई विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि अन्य उपक्रमांमध्ये आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचा सातत्याने उल्लेख होत असतो. हे यश टिकवून ठेवताना केवळ पायाभूत सुविधांवर नव्हे तर शैक्षणिक गुणवत्तेवर अधिक भर दिला पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारी आणि इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल अशी व्यापक योजना महाविद्यालयाने तयार करावी.”
या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, अभय बापट, शास्त्रीय गायक हर्ष नकाशे यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
‘वात्सल्य वैभव’ आजी-आजोबा निवास प्रकल्पाचे भूमिपूजन - तावडे कुटुंबियांच्या वतीने वाभवे-कोंडवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या “वात्सल्य वैभव” या आजी-आजोबा निवास प्रकल्पाचे भूमिपूजन खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विवेक तावडे, विलास तावडे, जयश्री कदम आदी उपस्थित होते.












