
दोडामार्ग : आडाळी एमआयडीसी जागेतील कथित खनिज माती उत्खननाचा प्रश्न प्रशासनावर सोपवून राजकीय नेत्यांनी आपली शक्ती तब्बल एक तपाहून अधिक काळ रिकाम्या असलेल्या आडाळी औद्योगिक क्षेत्रात उद्योग आणण्यासाठी आणि भूखंड वाटपावरील अघोषित बंदी उठवण्यासाठी खर्च करावी, असे आवाहन ग्रामस्थ आणि घुंगुरकाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत केले आहे.
प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आडाळी एमआयडीसीच्या जागेतील मातीचे उत्खनन होण्याच्या संदर्भात गेले काही दिवस माध्यमांमध्ये सतत बातम्या प्रसिद्ध होत आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते पत्रकार परिषदा घेवुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. यामुळे आडाळी गावची नाहक बदनामी होत असून शासन आणि एमआयडीसी प्रशासनाच्या भूमिकेमुळे आधीच जेरीला आलेले ग्रामस्थ चक्रावून गेले आहेत. या राजकीय साठमारीत येथील जनता आणि रोजगाराच्या संधींकडे डोळे लावून बसलेला दोडामार्ग तालुक्यातील युवक याना काडीचेही स्वारस्य नाही. गेली तेरा वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या औद्योगिक क्षेत्रात उद्योग येवून हाताला काम कधी मिळेल या प्रतीक्षेत ते आहेत.
मात्र दोडामार्ग तालुक्यात रोजगार, अर्थक्रांती या दृष्टीने गेमचेंजर ठरू शकणाऱ्या आडाळी एमआयडीसीच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष न देता प्रशासकीय अखत्यारीत येणाऱ्या विषयावर राजकीय नेते रान उठवित आहेत, हे खेदजनक आहे, असे श्री. लळीत यांनी म्हटले आहे. राज्याचे तत्कालीन उद्योगमंत्री आणि आताचे खासदार नारायण राणे यांनी ग्रामस्थांच्या मागणीला विधायक प्रतिसाद देवून विक्रमी काळात या औद्योगिक क्षेत्राला मंजुरी दिली. यामुळे आशा पल्लवित झालेल्या ग्रामस्थांनी आपली जमीन कोणताही अडथळा न आणता एमआयडीसीला दिली. यानंतर प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडलेले काम करून पायाभूत सुविधा उभारून घेण्यासाठी ग्रामस्थांच्या कृती समितीने सातत्याने प्रयत्न केले. प्रसंगी आंदोलनेही केली. मात्र उद्योजकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद असूनही एमआयडीसीच्या अनाकलनीय धोरणांमुळे येथे एकाही उद्योग घटकाची एक विटही रचली गेली नाही, ही विदारक वस्तुस्थिती आहे.
असे असताना या मूळ प्रश्नाऐवजी अनेक राजकीय नेते अहमहमिकेने भलत्याच प्रश्नावर लढत आहेत. सत्ताधारी पक्षात असलेल्या या नेत्यांनी आपली संपूर्ण शक्ती या ठिकाणी उद्योग आणण्यासाठी आणि येथील भूखंड वाटपावर लावलेली अघोषित बंदी उठवण्यासाठी वापरावी. मध्यंतरी ही जागा उद्योगांऐवजी रिसॉर्ट आणि गोल्फ प्रकल्पाला देण्याबाबत चर्चा सुरू होती. तो प्रश्नही या नेत्यांनी हातात घेवून त्याचा सोक्षमोक्ष लावावा. असे केल्यास येथील सर्व जनता त्यांची ऋणी राहील, असेही ‘घुंगुरकाठी’प्रणित आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार समितीचे सल्लागार असलेले श्री. लळीत यांनी निवेदनात म्हटले आहे.










