LIVE UPDATES

District-Level Presentation Competition : जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धा संपन्न

३३ स्पर्धकांचा सहभाग; २७ स्पर्धकांनी सादर केले नाविन्यपूर्ण संकल्पनांचे प्रात्यक्षिक
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 13, 2026 06:44 PM
views 106  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण व शहरी भागातील युवकांमधील नाविन्यपूर्ण विचारांना प्रोत्साहन देऊन स्थानिक समस्यांवर तंत्रज्ञानाधारित आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीयोग्य उपाय शोधण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धा दि. ४ व ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग येथे संपन्न झाली.

सामान्य प्रशासन विभागाच्या दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यात दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात आले. या अभियानाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत उद्योग विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग यांच्या समन्वयाने राज्यस्तरीय इनोव्हेशन चॅलेंज महाराष्ट्र २०२६ हा उपक्रम राबविण्यात आला. राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज अभियानाबाबत दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजीही शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.

 या स्पर्धेसाठी कृषी, कायदा व सुव्यवस्था, महिला व बालकल्याण, नागरी विकास, आरोग्य, संरक्षण, शाश्वतता व ऊर्जा, पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेसारखी उदयोन्मुख तंत्रज्ञाने तसेच शिक्षण व रोजगारक्षमता अशा दहा प्रमुख क्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३३ स्पर्धकांनी नोंदणी पोर्टलवर सहभाग नोंदविला होता. त्यापैकी २७ स्पर्धकांनी प्रत्यक्ष ऑनलाइन प्रात्यक्षिकाद्वारे आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण केले.

 स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रतिक थोरात, अतिरिक्त जिल्हा माहिती-विज्ञान अधिकारी (NIC) चे शुभम उपरीकर, जिल्हा महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा परिविक्षा अधिकारी  बी. जी. काटकर, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप, मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील तथा जिल्हा रोजगार मेळावा समितीच्या सदस्या श्रीमती गीता काळे, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य श्री. रमण बाणे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्री. महेश पाटील आणि सृजन ट्रस्टचे सदस्य श्री. संकल्प फळदेसाई यांनी तज्ज्ञ परीक्षक म्हणून काम पाहिले.

 या स्पर्धेनिमित्त जिल्हाधिकारी तथा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीच्या अध्यक्ष श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार)  जमीर बा. करीम, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्रीमती प्रतिभा चव्हाण, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोसचे प्राचार्य श्री. समीर गोरे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था व संबंधित कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले असून, स्थानिक प्रश्नांवर नाविन्यपूर्ण व तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.