
सावंतवाडी : कुणकेरी येथील पाळणेकोंड धरणातील पाणी सावंतवाडी नगरपरिषदेने सोडल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी सुमारे ८ ते १० फूटांनी खाली गेल्याचे चित्र आहे. आगामी काळात पावसाची शक्यता कमी असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन न केल्यास उन्हाळ्यात सावंतवाडी शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, अशी चिंता माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, याबाबत विचारणा करण्यासाठी मुख्याधिकारी यांना संपर्क साधला असता ते याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीत राज्यात शासनाकडून जलधारा सारखे उपक्रम राबविण्यात येत असताना दुसरीकडे न.प. प्रशानाचा बोजवारा उडल्याचा दिसून येत आहे.
श्री. परब म्हणाले, धरणातील पाणीसाठा जपण्याबरोबरच भविष्यातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. प्रशासनाच्या कामकाजावर सत्ताधाऱ्यांचे अपेक्षित नियंत्रण नसल्याने शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. नगरपालिका प्रभावीपणे चालविण्याबाबत सत्ताधाऱ्यांना स्वारस्य नसल्याचे चित्र असून पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर तातडीने उपाययोजना न झाल्यास त्याचा फटका आगामी उन्हाळ्यात सावंतवाडीकरांना बसण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, हे पाणी नेमक कशासाठी सोडलं गेलं ? याची विचारणा करण्यासाठी प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना फोन केला असता याबाबत ते अनभिज्ञ असल्याचे दिसले. याबाबत माहिती घेऊन कळवतो असे मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर झालेला असताना शासनाकडून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 'जलधारा' सारखे उपक्रम राबविण्यात येत असताना दुसरीकडे सावंतवाडीची तहान भागवणाऱ्या धरणाचे पाणी का सोडले ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.










