
कुडाळ : पावसाने अचानक दडी मारल्याने पाण्याअभावी भातशेती करपण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, कसाल परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीची माहिती घेतली.
कसाल येथील शेतकरी लवू परब आणि मोहन परब यांच्या भातशेतीची आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी भातपिकाला सध्या पाण्याची अत्यंत आवश्यकता असून, पाऊस लांबल्याने भाताचे पीक करपण्यास सुरुवात झाल्याची माहिती दिली. भात लावणीच्या शेतात जमिनीला तडे गेले असून, पाण्याअभावी उभे पीक धोक्यात आले आहे.
"कुडाळ-मालवण मतदारसंघात आज मी बाधित भागांची पाहणी करत आहे. पावसाअभावी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून सरसकट आणि जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यास प्राधान्य राहील. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची शासनाकडून काळजी घेतली जाईल," असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी यावेळी दिले.
पावसाने ओढ दिल्यामुळे केवळ भातशेतीच नव्हे, तर भुईमूग पिकालाही मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास शेतीच्या नुकसानीत आणखी वाढ होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेत आमदार राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. बाधित क्षेत्राची पाहणी करून नुकसानीची योग्य नोंद घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
या पाहणीवेळी कसालचे सरपंच राजन परब, ग्रामसेवक धुरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल, तलाठी अविनाश पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुप्रिया वालावलकर, महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून, शासनाकडून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.










