LIVE UPDATES

खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाकडून लेखी आदेश

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 27, 2026 19:33 PM
views 7  views

सिंधुदुर्गनगरी : दुष्काळ व्यवस्थापन संहिता-२०१६ मधील सुधारित निकष तसेच खरीप हंगाम २०२६ मधील परिस्थितीच्या आधारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, देवगड आणि वैभववाडी या आठही तालुक्यांमध्ये दुष्काळाची प्रथम कळ अर्थात ‘Trigger-1’ लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने संयुक्त पंचनामे करण्याचे लेखी निर्देश काल दि. २७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार तातडीने जिल्ह्यात पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत. 

खरीप हंगाम २०२६ मधील पिकांची परिस्थिती, पावसाची स्थिती आणि त्यातून निर्माण झालेल्या संभाव्य नुकसानीच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात येत आहे. Trigger-1 लागू झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यात तात्काळ पंचनामे करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी समन्वय साधून ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांच्या प्राथमिक संयुक्त पथकांची नियुक्ती करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या पथकांकडून खरीप हंगाम २०२६ मधील पिकांच्या नुकसानीचे प्राथमिक संयुक्त पंचनामे करण्यात येणार आहेत. पंचनाम्यादरम्यान नुकसानीची माहिती निश्चित स्वरूपात संकलित करण्याबरोबरच जीपीएस कोऑर्डिनेट्सही संकलित करण्यात यावेत. संकलित माहिती शासन निर्णयात विहित केलेल्या नमुन्यानुसार ‘प्रपत्र-क’मध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष शेतपातळीवरील नुकसानीची अचूक नोंद घेऊन पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी ती माहिती उपलब्ध होणार आहे.

तालुकास्तरावर करण्यात आलेल्या या पंचनाम्यांचा एकत्रित अहवाल जिल्हा कार्यालयाकडे तातडीने सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले असून, संबंधित महसूल, कृषी, पंचायत आणि स्थानिक प्रशासन यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.