
देवगड : देवगड तालुक्यात नववर्षाची सकारात्मक सुरुवात १३ समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमा यशस्वी करून करण्यात आली. यावेळी 'स्वच्छ किनारा - सुरक्षित पर्यावरण' हा संदेश देत नववर्षाची सुरुवात सकारात्मक कृतीने करणे, हीच या उपक्रमाची मुख्य प्रेरणा असल्याचे देवगड गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी सांगितलं.
देवगड तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत व जिल्हा परीषद सिंधुदूर्ग मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या संकल्पनेतुन तसेच गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नववर्षाच्या सुरुवातीलाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तब्बल १३ समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमा यशस्वीरीत्या राबविण्यात आल्या. तालुक्यातील १३ किनारपट्ट्यांवर स्थानिक नागरिक, युवक मंडळे, सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच ग्रामपंचायतींच्या सहभागातून या मोहिमा पार पडल्या.
नववर्षाच्या सुरवातीलाच देवगड तालुक्यात १३ समुद्र किनारी ४०३ हुन अधिकांनी सहभाग घेत प्लास्टिक व अन्य कचरा मिळुन ५०० किलो कचरा गोळा केला . या उपक्रमामुळे किनारे अधिक स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक झाले असून स्थानिक जैवविविधतेच्या संरक्षणाला हातभार लागला आहे. देवगड तालुक्यातील नागरिकांनी भविष्यातही अशा उपक्रमांत सातत्याने सहभाग घ्यावा, तसेच समुद्रकिनाऱ्यांवर कचरा न टाकण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.











