LIVE UPDATES

Devgad tourist : दिवाळी सुट्टीत कुणकेश्वर भाविकांनी गजबजले

ज्येष्ठ वयोवृद्ध भाविकांसाठी देवस्थान ट्रस्टची ‘स्टेअर चेअर’ सुविधा ठरतेय दिलासादायक
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 13, 2026 05:57 PM
views 88  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

देवगड : दिवाळीच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागांतून पर्यटक आणि भाविकांनी दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वरकडे आपला मोर्चा वळवला आहे. कुणकेश्वर मंदिरात सलग तिसऱ्या दिवशीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत आहेत. पर्यटक आणि भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे कुणकेश्वर शिवतीर्थ परिसर गजबजून गेला आहे.

दिवाळी सणाचे चार दिवस संपल्यानंतरही पर्यटनाचा उत्साह कायम आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या पडल्याने महाराष्ट्राच्या विविध भागांतून कौटुंबिक सहलींसाठी पर्यटक कोकणात दाखल होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड आणि परिसरातील पर्यटनस्थळांना पर्यटकांची विशेष पसंती मिळत आहे. देवगड तालुक्यातील लॉजिंग आणि हॉटेल्स पर्यटकांनी गजबजलेले पाहायला मिळत आहे .

या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ वयोवृद्ध तसेच दिव्यांग भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली ‘स्टेअर चेअर’ सुविधा विशेष कौतुकाचा विषय ठरत आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या वयोवृद्ध भाविकांना पायऱ्या चढणे-उतरणे त्रासदायक ठरू नये आणि त्यांनाही सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांना या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळत असून, त्यांचे दर्शन अधिक सुलभ होत आहे. देवस्थान ट्रस्टने केवळ धार्मिक पर्यटनाचा विचार न करता ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांच्या सोयी-सुविधांचीही योग्य काळजी घेतल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे. भाविकांच्या गर्दीचे योग्य नियोजन आणि सर्वांना सुलभ दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या देवस्थान ट्रस्टच्या या उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक होत आहे.