
देवगड : नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक घडविणे या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून स्थापन झालेला बिझनेस क्लब हा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना व्यवसायाच्या संधींमध्ये रूपांतरित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच उद्योजकतेचा अनुभव, व्यवसायाची दृष्टी, नेतृत्वगुण आणि आत्मनिर्भरतेची दिशा मिळणार आहे असे मार्गदर्शन करीअर कट्टाच्या देवगड तालुका समन्वयक प्रा.अक्षता मोंडकर यांनी शिरगांव येथिल कर्ले महाविद्यालयात केले
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण करून त्यांना व्यवसाय, स्वयंरोजगार आणि नवउद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिरगांव येथिल पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयात बिझनेस क्लबची स्थापना करण्यात आली. यावेळी प्रा. अक्षता मोंडकर म्हणात्या, बिझनेस क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्टार्टअप, स्वयंरोजगार, डिजिटल व्यवसाय, ई-कॉमर्स, स्थानिक व्यवसाय, व्यवसाय व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच उद्योजकांशी संवाद, व्यवसायविषयक व्याख्याने, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, व्यवसाय कल्पना सादरीकरण, बिझनेस प्लॅन स्पर्धा आणि विविध कौशल्यविकास उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य समीर तारी म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधींचा शोध घेण्याऐवजी स्वतःच्या व्यवसायाच्या संधी निर्माण करून इतरांसाठीही रोजगारनिर्मिती करणे आवश्यक आहे. हीच गरज लक्षात घेऊन बिझनेस क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे व्यावहारिक शिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या व्यवसाय कल्पनांना प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि व्यासपीठ उपलब्ध होणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची संस्कृती विकसित करण्यास मोठी मदत होणार आहे.
यावेळी बिझनेस क्लबच्या अध्यक्षपदी विराज लाड यांची तर कार्यकारिणीमध्ये सिद्धी सावळे,कशीश घाडी, मानसी भोगले, दीक्षिता खाड्ये यांची निवड करण्यात आली आहे.कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व पाध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.










