
देवगड : सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी रविवारी देवगड तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सवांना भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शिरगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव , तारामुंबरी येथील खवळे महागणपती तसेच देवगड पोलीस ठाण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन घेतले.
खवळे महागणपतीचे दर्शन घेतल्यानंतर खवळे कुटुंबीयांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शुभेच्छापर भाषणात बोलताना राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याची ताकद गणरायाने आपल्याला द्यावी, अशी प्रार्थना आपण गणरायाच्या चरणी केली आहे.
त्यानंतर त्यांनी देवगड पोलीस ठाण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या समवेत माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, संदीप साटम, दयानंद पाटील, योगेश चांदोस्कर, बंड्या नारकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










