
देवगड : एका बाजूला पोटच्या गोळ्याला कायमचे गमावल्याचे अथांग दुःख, तर दुसऱ्या बाजूला आपल्या याच दुःखामधून समाजाच्या कल्याणाचा विचार करणारी असीम संवेदनशीलता... अशाच एका अत्यंत हृदयद्रावक आणि समाजाचे डोळे उघडणाऱ्या घटनेची साक्ष नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाली आहे. देवगड तालुक्यातील हिंदळे येथील राणे दांपत्याने घेतलेल्या एका ऐतिहासिक आणि भावूक निर्णयामुळे एका पाच महिन्यांच्या अर्भकाचे देहदान करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यातून राणे दांपत्याचे कौतुक होत असून उपस्थितांचे डोळे कमालीचे पाणावले होते. हिंदळे येथील रहिवासी श्री. गजानन गणपत राणे आणि त्यांच्या पत्नी सौ. गायत्री गजानन राणे यांच्या पाच महिन्यांच्या अर्भकाला काही गंभीर शारीरिक व्यंग होते. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीअंती दिलेल्या सल्ल्यानुसार, पुढील धोके टाळण्यासाठी गर्भपात करणे अत्यंत गरजेचे झाले होते. हा निर्णय कोणत्याही माता-पित्यासाठी काळीज चिरणारा होता. मात्र, हे सत्य समोर आल्यानंतर राणे दांपत्याने दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही एक अत्यंत धाडसी व उदात्त विचार केला. आपल्या बाळाचे अस्तित्व या जगात नसले, तरी वैद्यकीय शिक्षणासाठी त्याचा देह उपयोगी पडावा, या हेतूने त्यांनी अर्भकाचे देहदान करण्याचा निर्णय घेतला.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून या दांपत्याने दि. १७ जून रोजी आपले पाच महिन्यांचे अर्भक शासकीय मेडिकल कॉलेज, सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय प्रक्रियेसाठी सुपुर्द केले. या देहदान प्रक्रियेच्या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. दवंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शरीरशास्त्र विभाग प्रमुख प्राजक्ता थेटे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब जोशी, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. कौस्तुभ देशपांडे, नेत्रदान समुपदेशक सिद्धार्थ कांबळे आणि कर्मचारी गोसावी आदी संबंधित अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. एका चिमुरड्या जीवाचा देह स्वीकारताना उपस्थित डॉक्टरांचे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचेही मन हेलावून गेले होते. याप्रसंगी रामानंद संप्रदाय सिंधुदुर्गचे पदाधिकारी आणि जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मानवतावादी प्रेरणेतून आजपर्यंत २१४ मरणोत्तर देहदान आणि १८२ अवयव दान यशस्वीरीत्या करण्यात आलेले आहे. याच महाकार्यात आता हिंदळे येथील राणे दांपत्याच्या या त्यागाची भर पडली आहे. स्वतःच्या दुःखावर मात करत समाजहिताला प्राधान्य देणाऱ्या राणे दांपत्याच्या या संवेदनशील निर्णयाचे सर्वच स्तरातून अत्यंत कौतुक आणि आदर केला जात आहे.











