LIVE UPDATES

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रवींद्र तिर्लोटकर यांचा लोकोपयोगी उपक्रम

देवगडमध्ये मोफत आधार सेवा, फार्मर आयडी नोंदणी व विविध शासकीय सुविधांचे आयोजन | नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: June 20, 2026 20:17 PM
views 25  views

देवगड : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, देवगड (पडेल मंडल) यांच्या वतीने नागरिकांसाठी विविध लोकोपयोगी सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे संकल्पक व प्रमुख संयोजक म्हणून पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर यांनी पुढाकार घेतला असून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिरात आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे, आधार पत्ता बदल, आधार फोटो व बायोमेट्रिक अपडेट, नवीन मतदार नोंदणी, फार्मर आयडी नोंदणी तसेच पी.एम. किसान योजनेशी संबंधित सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

विशेष म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे रवींद्र तिर्लोटकर यांनी सांगितले. शेतकरी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना एकाच ठिकाणी आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हे शिबिर सोमवार, २३ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हॉटेल विहंगम चेम्बर्स, विजयदुर्ग पोलीस स्टेशन समोर येथे आयोजित करण्यात आले आहे. संबंधित सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून सामाजिक व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेले रवींद्र तिर्लोटकर हे स्थानिक पातळीवर नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.