LIVE UPDATES

अनधिकृत आठवडा बाजारामुळे व्यापाऱ्यांची मालवण नगरपालिकेत धडक

देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करण्याची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 28, 2026 14:05 PM
views 27  views
#kokansadlive#news update#konkan update#

मालवण : मालवण देऊळवाडा येथे अनधिकृतपणे भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे सोमवार पेठेतील व्यापारी, दुकानदार व भाजी विक्रेत्या महिला यांचे मोठे नुकसान होत असून देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करून पूर्वांपारपणे एकत्रितरित्या सोमवार बाजारपेठ येथे आठवडा बाजार भरविण्यात यावा, याबाबत तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी मालवण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी मालवण नगरपालिकेकडे केली.

मालवण शहरातील व्यापाऱ्यांनी आज मालवण नगरपालिकेत धडक देऊन देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करण्याची मागणी आक्रमकपणे केली. यावेळी व्यापाऱ्यांनी नगरध्यक्षा सौ. ममता वराडकर व मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्याशी चर्चा केली. मालवण सोमवार पेठ येथे शिवकाळापासून आठवडा बाजार भरत आहे. सहा वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात पर्यायी व्यवस्था म्हणून देऊळवाडा येथेही आठवडा बाजार सुरु करण्यात आला. मात्र हा अनधिकृत बाजार अजूनही सुरु असून यामुळे सोमवार पेठ यां मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. 

यावर नगराध्यक्षा सौ. वराडकर व मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी व्यापाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नगरपालिकेच्या सभेत यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक, व्यापारी संघांचे पदाधिकारी तसेच व्यापारी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.