LIVE UPDATES

कारगिल विजय दिनानिमित्त भाजपकडून माजी सैनिकांचा सन्मान

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 28, 2026 15:32 PM
views 20  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ले :  कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांच्या वतीने राष्ट्रसेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या माजी सैनिकांचा घरी जाऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. यावेळी  नाईक सुभाषचंद्र सावळाराम परब (वजराठ) यांना सन्मानपत्र प्रदान करून त्यांच्या शौर्यपूर्ण सेवेला मानवंदना अर्पण करण्यात आली.

कारगिल युद्धात भारतीय जवानांनी दाखविलेल्या अद्वितीय शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करून शहीद वीरांना विनम्र अभिवादन करण्यात आले. देशाच्या सीमांचे रक्षण करताना सैनिकांनी दिलेले सर्वोच्च बलिदान हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असून, राष्ट्र त्यांच्या ऋणात सदैव राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सन्मानपत्राद्वारे नाईक सुभाषचंद्र सावळाराम परब यांच्या राष्ट्रसेवेचा, कर्तव्यपरायणतेचा आणि समर्पणाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या सेवेचा आदर्श भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्यासह उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर , शक्तिकेंद्र प्रमुख नितीन परब , ता.चिटणीस नितीन चव्हाण , बुथप्रमुख आनंद परब , माजी सरपंच सुर्यकांत परब , जेष्ठ कार्यकर्ते वसंत परब , शैलेश जामदार , राजु जळवी तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी सैनिक व  त्यांचे कुटुंबीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांनी राष्ट्ररक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत देशासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक सैनिकाचा सन्मान करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश दिला.