
कणकवली : परमहंस भालचंद्र महाराज यांच्या १२२ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह नमो भालचंद्राय ग्रुपच्या वतीने दीपोत्सव तसेच रिल मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ रविवारी सायंकाळी महापुरुष मित्र मंडळाच्या सजावट परिसरात ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या हस्ते भालचंद्र महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनी घरोगोती सजावटीत उत्स्फूर्त सहभाग घेतला असून भालचंद्र महाराज रोड व बाजारपेठ परिसर सायंकाळच्या वेळेस दीपोत्सवाने उजळून निघाला आहे. सजावटीमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून दिवाळी सणाची आठवण करून देणारा नजारा अनुभवायला मिळत आहे. “हेचि देही, हेचि डोळा” याचा प्रत्यय या निमित्ताने नागरिकांना येत आहे.
या शुभारंभप्रसंगी उमेश वाळके, राजा राजध्यक्ष, राजन ओटवकर, मंदार सापळे, राजू मानकर, प्रकाश ओरस्कर, उदय मुंज, हर्षल अंधारी, अमित सापळे, महेश मुंज, बाळा सापळे, बाळा मेनूकुदळे, प्रद्युम मुंज, बंड्या पारकर, प्रथमेश चव्हाण, नवल बिले, रुद्र सापळे, रोशन मांगले, संदीप अंधारी, संजय शिरसाठ, कपूर पटेल, उमेश आरोलकर, श्रीरंग पारगावकर, सुरज ओरसकर, हितेश मालंडकर, निलेश मानकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत बाबांची पालखी ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावरील नागरिकांसाठी घर सजावट स्पर्धा तसेच रील मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ४ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत होणार आहेत.
घर सजावट स्पर्धेसाठी बक्षिसे पुढीलप्रमाणे आहेत
प्रथम ₹७,७७७ | द्वितीय ₹६,६६६ | तृतीय ₹५,५५५ | चतुर्थ ₹४,४४४ | पंचम ₹३,३३३ तसेच उत्तेजनार्थ तीन पारितोषिके प्रत्येकी ₹१,१११ व ‘सुजाण प्रेक्षक’ पुरस्कारासाठी ₹१,१११ देण्यात येणार असून प्रत्येक सहभागी स्पर्धकास सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
रील मेकिंग स्पर्धेसाठी प्रथम ₹३,००० | द्वितीय ₹२,००० | तृतीय ₹१,००० अशी पारितोषिके असून विजेत्यांचा गौरव भालचंद्र महाराज जयंतीच्या दिवशी करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी हनुमंत तांबट व प्रथमेश गावकर परीक्षक म्हणून काम पाहत आहेत.
ही स्पर्धा सलग ७ व्या वर्षी आयोजित करण्यात येत असून शहरात भक्तिमय वातावरणासोबतच स्वच्छता, सौंदर्य आणि सामाजिक प्रबोधन व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले.











