दोडामार्ग : दोडामार्ग तालुका हे माझं घर आहे. प्रत्येक गावावर माझे प्रेम आहे. मंत्री झाल्यापासून ज्या ज्या विकास कामांसाठी निधी मागितला गेला आहे त्यासाठी मी भरघोस निधी दिला आहे. आतापर्यंत झाली नाहीत एवढी कामे मी माझ्या कारकिर्दीत केली आहेत. तरीही विरोधक टीका करीत आहेत. मात्र त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून आपण आपले काम करत राहिले पाहिजे. तसेच येणाऱ्या काळात प्रत्येक घटकांसाठी आपला मास्टर प्लॅन तयार असून येथील हर एक घटकाचा यातून आर्थिक विकास होणार असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार तथा मंत्री दीपक केसरकर यांनी मोरगाव येथे केले.
मंत्री दीपक केसरकर आज प्रचारार्थ दोडामार्ग तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी गावागावात जात ग्रामस्थांच्या गाटीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले बाळा गावडे, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) सत्यवान गवस, भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर, तुकाराम बर्डे, दादा देसाई, तिलकांचन गवस, रामदास मेस्त्री, सूर्यकांत गवस, चंदू मळीक, विठोबा पालयेकर, दया धाऊस्कर, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, सानवी गवस, पूजा देसाई, विशाखा नाईक,आदी अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ पदाधिका कार्यकर्ते उपस्थित होते.
आडाळीत लवकरच उद्योग येतील
सध्या आडाळी एमआयडीसी सध्या पायाभूत सुविधांचे काम युद्घपातळीवर सुरू आहेत. तेथील अनेक कामांसाठी आपण स्वतः निधी दिला आहे. उद्योगांसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आता लागणाऱ्या विजेसाठी सबस्टेशनचे काम सुरू असून ते काम पूर्ण होतास ३९ कंपन्याची उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणीही उगाच टीका करण्यात आपला वेळ फुकट घालवू नये. मी मुंबईचा पालकमंत्री असून भारतातील पहिल्या क्रमांकांच्या फार्माटिकल्स कंपन्याशी माझे बोलणे झालेले आहे त्या सर्व कंपन्या लवकरच या एमआयडीसीत उभारण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.
अम्यूझमेंट पार्क प्रकल्प होणारच
तिलारी धरण क्षेत्रातील नियोजित जागेत आपण अम्यूझमेंट पार्क प्रकल्प उभरणाराच आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्याचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. तालुक्यातील प्रत्येक हाताला काम मिळणार आहे. यासाठी येथील जनतेने आपल्याला सहकार्य करावे असेही केसरकर यांनी यावेळी सांगितले.
जमिनी लाटणाऱ्यांना गावात घेऊ नकोत
आता माझा विरोधात उभे राहिलेल्या पैकी काही जणांनी शेतकऱ्यांच्या कवडी मोल भावाने जमिनी लाटल्या आहेत. त्यांनी अनेक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना निवडून दिल्यास ते बिन्धास्तपणे येथील शेतकऱ्यांची फसवणूक करणार आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींना आपल्या गावात यायला देऊ नकोत. तसेच बाकीचे उमेदवार हे बाहेरील आहेत त्यांना येथील जनतेचे काहीही देणं घेणं राहिलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही सर्व सुज्ञ आहात यावेळी महायुतीला सहकार्य करून मलाच मतदान करा असेही आवाहन केसरकर यांनी केले आहे.
अनेक कामे मी पूर्ण केलीत
इकडे येऊन वाचाळ बोलत फिरणारे म्हणत आहेत. सावंतवाडी मतदार संघात एकही काम झाले नाही. या भागातील अनेक गावांना जोडणारे रस्ते मीच मंजूर करून पूर्ण केले आहेत. आणि ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत तीही मीच केली आहेत. आता पंचायत समिती इमारत, उपजिल्हा रुग्णालय इमारत, नगरपंचायत इमारत, मच्छीमार्केट इमारत, मीच मंजूर करून आणली आहेत. येणाऱ्या काळात नाट्यगृह, तसेच अन्य विकास कामांसाठी माझा प्रयत्नातून निधी देण्यात आला आहे. त्यामुळे जे कोण टीका करत आहेत त्यांनी आपले डोळे नीट उघडून ही कामे बघावित असेही मंत्री केसरकर म्हणालेत.
उबाठा पक्षावर नाराज : बाळा गावडे
उबाठा पक्षाकडून आपल्याला ऑफर आली. त्यावेळी मी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला आणि अडीच वर्ष मी पक्ष संघटनेसाठी काम केल आणि विधानसभा निवडणुकीवेळी मेरिट लिस्ट वर माझं नाव होत. मला या मतदार संघात काम करण्याची संधी उबाठा शिवसेनेने द्यायला हवी होती. मात्र ऐनवेळी बाहेरून आलेल्याना संधी दिली. एकंदरीत राजकारणातून अलिप्त रहाव समाज कार्य कराव अस वाटू लागल. दीपक भाई यांच्या माध्यमातून आपण शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आणि इथ काम करायला चांगल वाटत.