
सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सावंतवाडीत ‘असंघटीत लोककलांचा महोत्सव’ या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा वैभवपूर्ण आनंद अनुभवण्याची संधी देणारा हा महोत्सव २२, २३ आणि २४ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.
सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै बहुउद्देशीय सभागृहात हा महोत्सव रंगणार असून तीनही दिवस कार्यक्रमांची सुरुवात सायंकाळी ठीक ६ वाजता होणार आहे. या महोत्सवासाठी सर्व रसिक प्रेक्षकांना प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोककलेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
तीन दिवसीय या महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागांतील पारंपरिक, दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शुक्रवार २२ मे रोजी करपल्लवी गोंधळी, बहुरूपी, धनगरी ओवी, हेळवी लोककलावंत तसेच पारंपरिक फुगडी आणि झिम्मा या कलाप्रकारांनी रंगतदार सुरुवात होणार आहे.
शनिवार, २३ मे रोजी आदिवासी पाटा गायन, खेळे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, धिरो धिरो नृत्य, मयूर नृत्य आणि लेंगी बंजारा नृत्य अशा वैविध्यपूर्ण कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे.
महोत्सवाच्या अंतिम दिवशी रविवार, २४ मे रोजी दशावतार, कोळी नृत्य, सोंगी मुखवटे, भारुड तसेच दिमडी, ढोलकी आणि ढोल-ताशा वाद्यवृंद जुगलबंदीचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. कोकणासह महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेण्याची ही सुवर्णसंधी सावंतवाडीकरांना मिळणार आहे.










