धाडसी घरफोडीत २० तोळ्यांचे दागिने - २ लाखांची रोकड लंपास

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 04, 2025 21:07 PM
views 543  views

कणकवली : कळसुली - गडगेवाडी येथे दिवसाढवळ्या झालेल्या एका धाडसी घरफोडीत चोरांनी 20 तोळे सोने, काही चांदी आणि सुमारे 2 लाख 15 हजार रुपये रोख रक्कम असा मोठा ऐवज घेऊन पोबारा केला आहे. मंगळवारी दुपारी 12.30 ते 1 वाजेच्या सुमारास विनायक दळवी यांच्या घरी ही घटना घडली. दळवी कुटुंब भात कापणीसाठी शेतात गेले असताना, घराला लक्ष्य करून ही चोरी करण्यात आली.

विनायक दळवी हे त्यांच्या कुटुंबासह मंगळवारी दुपारी भात कापणीच्या कामासाठी शेतात गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. दळवी कुटुंब दुपारी घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात प्रवेश केला असता, घरातील कपाटांमधील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. कपाटांची तपासणी केली असता, त्यामधील अंदाजे 20 तोळे सोने, काही चांदीचे दागिने आणि सुमारे 2 लाख 15 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत लाखोंच्या घरात आहे.

घटनेची माहिती मिळताच कळसुलीचे सरपंच सचिन पारधिये आणि पोलिस पाटील सारिका कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, कणकवली पोलिसांनी पंचनामा करून तपासणी सुरू केली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कणकवली पोलीस ठाण्यात सुरू आहे.