
सावंतवाडी : बांदा मुस्लिमवाडी येथील आफताब कमरुद्दीन शेख या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी बांदा पोलिसांनी आज दिवसभरात मृताची पत्नी आई व भाऊ यांचे जबाब नोंदवून घेतले. जाबजबाब नोंदविल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालील पुढील कारवाई करणार असल्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सांगितले. तर, आज सावंतवाडी नगरपरिषदेच्या शववाहीनीने पोलिसांच्या उपस्थित उपजिल्हा रुग्णालयातील ते शव अखेर जिल्हा रूग्णालय ओरोस येथे हलविण्यात आले.
गेले चार दिवस हे शव उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहात होते. येथील परिस्थितीची विचार करता ते जिल्हा रूग्णालयात हलवावे अशी विनंती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांनी पोलिस प्रशासनाकडे केली होती. अखेर आज सायंकाळी पोलिसांच्या उपस्थितीत हे शव ओरोस येथे हलविण्यात आले. आज घटनेच्या चौथ्या दिवशीही बांदा पोलिसात संशयिताविरोधात गुन्हा दाखल न झाल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सकाळी मृताच्या नातेवाईकांचे जाबजबाब नोंदवण्यास बांदा पोलिसांनी सुरुवात केली. यावेळी सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक विकास बडवे, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण, बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे आदी अधिकारी उपस्थित होते.
आज सकाळी मृत आफताब याची पत्नी, आई व भाऊ यांचे जबाब बांदा पोलिसांनी नोंदविले. मृत आफताब याने मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत ज्या पाच संशयितांची नावे घेतली, त्यांच्यावर सायंकाळी उशिरापर्यंत बांदा पोलिसात गुन्हा दाखल न झाल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे राज्य सदस्य वसीम बुऱ्हाण यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून आफताबच्या आत्महत्या प्रकरणी संशयीतांवर तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करण्याचे पत्र दिले आहे. तसेच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा करत या प्रकरणाची चौकशी करत योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले.














