
सावंतवाडी : बांदा येथील आफताब कमरूद्दीन शेख (वय ३८, रा. मुस्लिमवाडी) या तरुणाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फुलांचे दुकान लावण्यावरून वारंवार होणाऱ्या अडवणुकीतून आलेल्या नैराश्यातून आफताबने बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर गेले पाच दिवस त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. व्हिडिओमध्ये नाव घेतलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी होती. त्यानुसार काल रात्री उशीरा ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आत्महत्या करण्यापूर्वी आफताब याने व्हिडिओ बनवला होता. यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी बांदा शहरातील ५ जण जबाबदार असल्याचे म्हटले होते. आपल्या व्यवसायास परवानगी न मिळाल्याने कुटुंबाची हलाखीची परिस्थिती झाली असून पत्नी-मुलांचे हाल होत असल्याचे सांगत त्यांनी गळफास लावत आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, आत्महत्या करणारा आफताब शेख हा आठ महिन्यांपूर्वी 'फुलांवर थुंकल्याचा' आरोप करण्यात आला होता. यातून त्याला दुकान लावण्यास अटकाव केला जात होता. त्यामुळे नैराश्यातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न त्याने केला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये बांदा येथील तरूणांची नाव घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. गेले पाच दिवस मृतदेह ताब्यात घेतला गेला नाही. उपजिल्हा रुग्णालयातील हा मृतदेह जिल्हा रूग्णालय ओरोस येथे हलविण्यात आला.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला होता. गुन्हा दाखल करून कारवाई केल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी नातेवाईकांनी दर्शवल्यानंतर मयताचा भाऊ अब्दुल रजाक कमरूद्दीन शेख यांच्या तक्रारीनुसार बांदा पोलीसांनी काल रविवारी रात्री संबंधित तरूणांवर गुन्हा दाखल केला. बांदा येथील निलेश पटेकर सावंत, बाबा काणेकर, गुरू कल्याणकर, हेमंत दाभोलकर, जय पटेकर या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.












