
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई यांच्याकडून सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांचे बांदा आत्महत्या प्रकरणी लक्ष वेधण्यात आले आहे. अल्पसंख्यांक युवक आफताब कामरुद्दीन शेख आत्महत्या प्रकरणी आरोपींवर तात्काळ कारवाई अहवाल देणे करण्याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग, मुंबईचे राज्य सदस्य वसीम ख्वाजाभाई बुऱ्हाण यांनी एसपींना दिले असून याची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविण्यात आल्याचे श्री. बुऱ्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सावंतवाडी येथील बांदा मुस्लिमवाडी येथील आफताब कामरुद्दीन शेख याने आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये त्याने बांदा शहरातील काही लोकांवर अत्याचार आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आत्महत्या करिता प्रोत्साहन केल्याचे दिसते, नातेवाईकांनी तक्रार दाखल केली असूनही अद्याप आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली नाही. तिसऱ्या दिवशीही मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला असून, आरोपींवर जोपर्यंत गुन्हा दाखल करून अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. म्हणून, आपणास विनंती आहे की, या प्रकरणात तात्काळ कारवाई करून आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करावी आणि नातेवाईकांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती पत्राद्वारे वसीम ख्वाजाभाई बुहऱ्हाण यांनी केली आहे.













