सिंधुदुर्ग : 5 ऑक्टोबरला कणकवली येथे भाजप राहुल गांधी यांनी अमेरीकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी आरक्षण बचाव रॅली काढत आहेत. मुळात राहुल गांधी अमेरीकेत नक्की काय म्हणाले हे समजून घेण्याची गरज आहे. राहुल गांधीना अमेरीकेत ज्यावेळी आरक्षणावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राहुल गांधी म्हणाले, ज्यावेळी देशातील जातीभेद नष्ट होईल, समाजातील सर्व घटकांना समान हक्क व न्याय मिळेल तेव्हा आम्ही आरक्षण रद्द करण्याचा विचार करू, सद्या ती परिस्थिती भारत देशात नाही. याचाच अर्थ जो पर्यंत जातीभेद नष्ट होत नाही, समाजातील सर्व घटकांना समान हक्क व समान न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतातील आरक्षण संपुष्टात येणार नाही. हीच भूमिका भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. अमेरिकन भाषा ही इंग्रजी असल्यामुळे आणि प्रश्न विचारणाऱ्याने इंग्रजीत प्रश्न विचारल्यामुळे राहुल गांधी यांनी इंग्रजीत उत्तर दिले. आंदोलन करणाऱ्या भाजपच्या नेत्याना राहुल गांधी हे इंग्रजीत नक्की काय म्हणाले हे कळले नसेल तर त्यांनी त्यांच्याच पक्षातील नितीन गडकरीं सारख्या इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांकडून भाषांतर करून घेतले असते तर त्यांना राहुल गांधी यांच्या विरोधात आरक्षण बचाव आंदोलन करण्याची आवश्यकता भासली नसती.
मुळात भाजप हा कायम आरक्षण विरोधी राहिला आहे. म्हणूनच केंद्रात गेली दहा वर्षे सत्ता असून जातीगत जनगणना करत नाही. स्वातंत्र्य प्राप्ती नंतरच्या काळात नरेंद्र मोदी यांची सत्ता केंद्रात येईपर्यंत काँग्रेसच्या सरकारने यादेशात अनेक सार्वजनिक उद्योग निर्माण केले हे सार्वजनिक उद्योग सरकारच्या मालकीचे असल्यामुळे या सार्वजनिक उद्योगात आरक्षण होते. परंतू नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर हे सार्वजनिक उद्योग विकण्याचा सपाटा लावला. सार्वजनिक उद्योगच नसतील तर त्यामध्ये आरक्षण कसे मिळणार. *न रहेगा बांस न बजेगी बासुरी* आज केंद्र सरकारच्या अखत्यारीत लाखो सरकारी पदे रिक्त आहेत ती भरली जात नाहीत. काही वेळेस काही पदे भरण्यासाठी परिक्षा होते आणि पेपरफुटून परिक्षाच रद्द होतात. केंद्र सरकार काही पदे कोणतीही परिक्षा न घेता आरक्षण डावलून भरती करत आहे. त्यामुळे भाजप हाच खरा आरक्षणाचा मारेकरी आहे आणि म्हणून भाजपच्या नेत्यांनी आरक्षण बचाव रॅली काढणे हाच मोठा विनोद आहे अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली आहे.
इर्शाद शेख पुढे म्हणाले, राहुल गांधी जातीगत जनगणना होण्यासाठी संसदेत संघर्ष करतात, समाजातील वंचित घटकांना समान हक्क व न्याय मिळावा अशी त्यांची भूमिका असते. आरक्षण म्हणजे गरीबी हटाव मोहीम नाही तर समाजातील सर्व घटकांना समान हक्क व न्याय मिळाला पाहिजे ही राहूल गांधींची भूमिका आहे आणि भारताचे संविधान सुद्धा हेच सांगते त्यामुळे देशातील आणि जिल्ह्यातील सर्व जनतेला राहुल गांधींची भूमिका माहीत आहे त्यामुळे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून विधानसभेत फायदा मिळवण्यासाठी अशी रॅली कोण काढत असेल तर जिल्ह्यातील जनता त्याला बळी पडणार नाही तुमचा हेतू जिल्ह्यातील जनता चांगल्या प्रकारे समजून चुकली आहे.