LIVE UPDATES

जिल्ह्यात 'सर्वंकष आरोग्य सेवा' प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ...

सर्व ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टप्प्याटप्प्याने दोन दिवसीय निवासी प्रशिक्षणा राबविणार
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 21, 2026 19:44 PM
views 27  views

सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच अधिक सक्षम, दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी तसेच "अधिक उपचार, कमी  रेफरल" ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने राज्यात 'सर्वंकष आरोग्य सेवा' प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून हा प्रशिक्षण कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद माननीय अध्यक्ष प्रमोद कामत, प्रितेश राऊळ, आरोग्य व शिक्षण सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या नियंत्रणाखाली या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील सर्व ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टप्प्याटप्प्याने दोन दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सहाय्यक, एएनएम, एमपीडब्ल्यू तसेच आशा स्वयंसेविका सहभागी होत आहेत.

या प्रशिक्षणामध्ये तांत्रिक सत्रे, गटचर्चा व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून १४ महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये गर्भवती व प्रसूतीपश्चात मातांची काळजी, नवजात शिशू व बाल आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे निदान, प्रतिबंध व व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, वृद्धांची आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच आयुष उपचार पद्धतींचा प्रभावी वापर आदी विषयांचा समावेश आहे. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी सांगितले की, "सर्वंकष आरोग्य सेवा प्रशिक्षणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य अधिक सक्षम होणार असून, नागरिकांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच अनावश्यक रेफरलचे प्रमाण कमी करून प्राथमिक स्तरावर अधिकाधिक उपचार देणे शक्य होईल."

जिल्ह्यातील सर्व ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ज्ञान, कौशल्य व कार्यक्षमतेत वाढ करून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.