
जुनाच मीटर पुन्हा बसवण्याची नामुष्की !
कुडाळ : सध्या गाजत असलेल्या 'स्मार्ट मीटर'चा वाद आता थेट गावागावांत पेटू लागला आहे. आज कुडाळ येथील भैरववाडी येथे ग्राहकाला कोणतीही पूर्वकल्पना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न महावितरणच्या अंगलट आला. संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत थेट घेराव घातल्याने काही काळ परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर वाढता रोष पाहून कर्मचाऱ्यांना नवीन स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुनाच मीटर बसवून तिथून काढता पाय घ्यावा लागला.
भैरववाडी येथील स्थानिक रहिवासी आनंद कुडाळकर यांच्या घराच्या व्हरांड्यात बसवलेला जुना मीटर काढून त्या जागी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्मार्ट मीटर बसवला. हा प्रकार घरातील सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने याला विरोध केला. मीटर बदलल्याची बातमी वाडीत वाऱ्यासारखी पसरली आणि बघता बघता संपूर्ण भैरववाडी येथील नागरिक एकवटले.
एकत्र आलेल्या नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घेराव घातला आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. "लाईट बिल भरले नसले तरी तुम्ही बिलावर व्याज आकारता, मग आमची परवानगी न घेता मीटर बदलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता तुम्ही घरात घुसून मीटर बदलता कसे?" असे असंख्य सवाल करत नागरिकांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
नागरिकांचा आक्रमक पवित्रा आणि वाढता संताप पाहून उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी नमती भूमिका घेतली. त्यांनी तात्काळ तो नवीन स्मार्ट मीटर काढला आणि आनंद कुडाळकर यांच्या घरात पुन्हा जुनाच मीटर पूर्ववत बसवून दिला. यानंतरच कर्मचाऱ्यांची तिथून सुटका झाली.
स्मार्ट मीटरला होणारा हा विरोध पाहता महावितरणने आतातरी यातून धडा घेण्याची गरज आहे. ग्राहकांना विश्वासात न घेता, कोणतीही पूर्वसूचना न देता छुप्या पद्धतीने मीटर बदलण्याची महावितरणची ही कार्यपद्धती कधीतरी मोठ्या अनर्थाला कारणीभूत ठरू शकते.
"शेवटी मैदानावर काम करणारा कर्मचारी हा देखील एक सामान्य नागरिकच आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि नियोजनाअभावी या कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे?" असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. या प्रकारानंतर कुडाळ परिसरात स्मार्ट मीटर विरोधातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावेळी नगरसेविका अक्षता खटावकर, शिवसेना उबाठा गटाचे राजन नाईक व वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.











