LIVE UPDATES

नारूर येथे संविधान मूल्यांवर आधारित बालमेळावा उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 21:14 PM
views 20  views

कुडाळ : नारूर ग्रामपंचायत आणि महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 ऑगस्ट रोजी नारूर येथे संविधान मूल्यांवर आधारित बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. बालकांमध्ये संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या मूल्यांची रुजवणूक करणे, मुलांना त्यांच्या हक्कांची व कर्तव्यांची जाणीव करून देणे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे हा या बालमेळाव्याचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमास नारूर गावच्या सरपंच वैष्णवी मेस्त्री, मासूमच्या फेलो फिजा मकानदार, जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त जयराम जाधव, मुख्याध्यापक पंढरीनाथ जाधव, संजय घाडी, अंगणवाडी सेविका अस्मिता देसाई, पालक मधुकर तेरसे तसेच भाविका कदम, श्रुती सावंत,नासिर मकानदार, रोहित पेडणेकर आणि नारूर गावातील विद्यार्थी उपस्थित होते.

वृक्षारोपणाने झाली बालमेळाव्याची सुरुवात

बालमेळाव्याची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. निसर्गाचे संरक्षण, पर्यावरणाची काळजी आणि भावी पिढीसाठी हिरवेगार भविष्य निर्माण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. संविधानातील कर्तव्यभावना आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी यांची सांगड घालत मुलांना पर्यावरणाबद्दल संवेदनशील बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फिजा मकानदार यांनी केले. यानंतर नारूर गावच्या सरपंच वैष्णवी मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत बालमेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आणि या उपक्रमातून नवीन गोष्टी शिकण्याचे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यानंतर बालमेळाव्यातील उपक्रमांची सुरुवात ‘असावा सुंदर समतेचा बंगला’ या प्रेरणादायी गीताने करण्यात आली. गीताच्या माध्यमातून मुलांना समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान सन्मान, समान संधी आणि समान अधिकार मिळणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देण्यात आली.

यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख करून घेण्यासाठी एक सर्जनशील उपक्रम घेण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याला कागद देऊन स्वतःचे चित्र काढण्यास, स्वतःमध्ये असलेले गुण लिहिण्यास आणि मोठे होऊन काय बनायचे आहे हे मांडण्यास सांगण्यात आले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या गुणांची आणि क्षमतांची ओळख झाली. तसेच प्रत्येकाला आपली स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी समान संधी मिळण्याचा अधिकार आहे, हा विचार संविधानातील समतेच्या मूल्याशी जोडून समजावून सांगण्यात आला.

‘आईचं पत्र हरवलं’ – खेळातून संविधान मूल्यांची ओळख

यानंतर ‘आईचं पत्र हरवलं’ हा खेळ घेण्यात आला. या खेळाच्या माध्यमातून संविधानातील विविध शब्द आणि मूल्ये मुलांना सोप्या आणि आनंददायी पद्धतीने समजावून सांगण्यात आली. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, अधिकार आणि कर्तव्य यांसारख्या संकल्पनांची मुलांना खेळातून ओळख करून देण्यात आली.

दैनंदिन जीवनातील संविधान आणि पर्यावरण

यानंतर जयराम जाधव सरांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात संविधानाचे महत्त्व कसे आहे आणि संविधानातील मूल्ये आपण आपल्या रोजच्या वागणुकीत कशी आचरणात आणू शकतो, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरण संवर्धन, झाडांचे महत्त्व आणि निसर्गाचे संरक्षण याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

चॉकलेटच्या खेळातून समानतेचा संदेश

यानंतर विद्यार्थ्यांसाठी चॉकलेटचा गंमतीदार खेळ घेण्यात आला. या खेळातून विद्यार्थ्यांना समानता हा संविधानातील महत्त्वाचा मूल्यविचार प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगण्यात आला. प्रत्येकाला समान संधी आणि समान वागणूक मिळणे का आवश्यक आहे, हे मुलांनी खेळातून समजून घेतले.

गटचर्चेतून विद्यार्थ्यांनी मांडली आपली मते

यानंतर विद्यार्थ्यांचे चार गट करण्यात आले आणि प्रत्येक गटाला वेगवेगळे विषय देऊन गटचर्चा घेण्यात आली.

पहिला गट – झाडे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो?

दुसरा गट – पाणी वाचवा आणि पाण्याचे महत्त्व

तिसरा गट – मोबाईलचा वापर : फायदे आणि तोटे

चौथा गट – माझ्या स्वप्नातील गाव

या सर्व विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे चर्चा केली आणि आपली मते आत्मविश्वासाने मांडली. एकमेकांचे विचार ऐकणे, मतांचा आदर करणे, चर्चा करणे आणि सामूहिकपणे विचार मांडणे या लोकशाही मूल्यांचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.

यानंतर विद्यार्थ्यांसोबत ‘पाडू चला रे भिंत’ हे प्रेरणादायी गीत घेण्यात आले. समाजातील भेदभाव, असमानता आणि मनामनातील अंतराच्या भिंती दूर करून समता आणि बंधुतेचा समाज निर्माण करण्याचा संदेश या गीतातून देण्यात आला.

‘हम होंगे कामयाब’ने प्रेरणादायी समारोप

बालमेळाव्याच्या समारोपावेळी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र गोल करून ‘हम होंगे कामयाब एक दिन’ हे प्रेरणादायी गीत घेण्यात आले. सर्वांनी एकत्रितपणे गीत म्हणत एकता, आत्मविश्वास आणि आपण नक्कीच यशस्वी होऊ असा सकारात्मक संदेश दिला.

शेवटी विद्यार्थ्यांच्या आवडीची गाणी लावण्यात आली आणि सर्व विद्यार्थ्यांनी मनमुराद नृत्य करत आनंद व्यक्त केला. खेळ, गाणी, गटचर्चा, सर्जनशील उपक्रम आणि संविधान मूल्यांच्या माध्यमातून हा बालमेळावा विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरला.

“खेळातून शिक्षण, संवादातून विचार आणि संविधानातून मूल्यांची जडणघडण” या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा बालमेळावा मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि मनात संविधानाच्या मूल्यांची नवी जाणीव निर्माण करून उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.