
कुडाळ : गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही कुडाळ शहरातील रस्त्यांची चाळणी झाली असून, खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे चाकरमानी आणि ग्रामस्थांना प्रवासात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या संथ गती आणि निकृष्ट दर्जाच्या कामांविरोधात आक्रमक होत नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे बांधकाम विभागाचा भोंगळ व ढिसाळ कारभार अक्षरशः चव्हाट्यावर आला आहे.
रस्त्यांच्या या बिकट परिस्थितीचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेवक गणेश भोगटे, आबा धडाम, चेतन पडते, प्रथमेश केळबाईकर, बाबा तेली, चंदन कांबळी, राजवीर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक पीडब्लूडी कार्यालयात धडकले होते. मात्र, या वेळी संबंधित अधिकारी पिसाळ हे कार्यालयात अनुपस्थित आढळल्याने वातावरण चांगलेच तापले. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजता भेटीची वेळ निश्चित करण्यात आली.
नियोजित वेळेनुसार संध्याकाळी झालेल्या बैठकीत कार्यालयातील हालचाल नोंदवही, बायोमेट्रिक, उपस्थिती आणि रस्ते दुरुस्तीच्या मुद्द्यांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. केवळ कागदी चर्चा न करता नगरसेवक व संतप्त नागरिकांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते कविलकट्टा मार्गावरील खड्ड्यांच्या ठिकाणी नेऊन सत्य परिस्थिती दाखवून दिली.
वारंवार खड्डे पडले की केवळ तातडीची मलमपट्टी करण्याचे काम केले जात असल्याचा संताप जनतेने व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. "झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन अत्यंत गरजेचे होते," अशी प्रतिक्रिया या वेळी नागरिकांमधून उमटली.
तब्बल चार तास चाललेल्या या ठिय्या आंदोलनादरम्यान सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर, अखेर १ सप्टेंबरपासून खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन बांधकाम विभाग उप अभियंता पिसाळ यांच्यातर्फे देण्यात आले. हे लेखी पत्र हाती आल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे प्रशासनाचा अनागोंदी कारभार उघडकीस आला असून, आता प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे संपूर्ण कुडाळवासीयांचे लक्ष लागले आहे.










