
सावंतवाडी : पुणे नॉलेज क्लस्टर, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उपक्रमशील,तंत्रस्नेही विज्ञान शिक्षकांसाठी केम अमेझ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. गेमिफिकेशनच्या माध्यमातून विज्ञान शिक्षण अधिक प्रभावी, आकर्षक आणि आनंददायी बनविण्यासाठी केम अमेझ हा एक अभिनव उपक्रम असून, डिजिटल आणि प्रत्यक्ष (Hands-on) अनुभवातून रसायनशास्त्राचे शिक्षण अधिक संवादात्मक, रंजक आणि संकल्पनाधारित करण्याचा उद्देश आहे.

या कार्यशाळेत सहभागी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आधुनिक अध्ययन-अध्यापन पद्धती,डिजिटल गेम-आधारित शैक्षणिक साधने,खेळ आणि प्रयोगशाळेत घेता येणाऱ्या उपक्रमांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले गेले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) शी सुसंगत असलेली ही साधने विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, संकल्पनांचे सखोल आकलन घडविणे आणि विज्ञान शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी व परिणामकारक बनविण्यास मदत करणार आहेत.
एस.पी.के. कॉलेज हॉल सावंतवाडी व एच.पी.सी.एल. हॉल कणकवली कॉलेज या दोन ठिकाणी जिल्हास्तरीय कार्यशाळा शिक्षकांसाठी तसेच माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली,मदर्स क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी व खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. यासाठी पुणे नॉलेज क्लस्टरच्या जानवी अग्रवाल, शितल नागपुरे, चिन्मय स्वामी आणि निहारिका गोगटे यांनी मार्गदर्शन केले.
श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे उदघाटन सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळच्या विश्वस्त श्रद्धाराजे लखमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत खेमसावंत भोसले, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एल. भारमल, उपक्रम समन्वयक तथा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश गावडे, जिल्हा सदस्य संजय शेवाळे, प्रिती सावंत, राजाराम फर्जंद, रुपेश कर्पे, नेहा दळवी, सोनाली बांदेलकर उपस्थित होते तसेच कणकवली कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा साळुंखे मॅडम यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.जे. कांबळे, विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष रघुनाथ कारेकर, सचिव सत्यपाल लाडगावकर, सुषमा केणी, प्रणिता बांबूळकर उपस्थित होते.
जिल्ह्यातील दीडशेहून अधिक माध्यमिक विद्यालयातील तंत्रस्नेही विज्ञान शिक्षक तसेच महाविद्यालयातील बी.एस.सी.व एम.एस.सी.च्या विद्यार्थिनीना याचा प्रत्यक्ष लाभ घेतला.
यावेळी सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे लखमसावंत भोसले यांचा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
उपक्रम समन्वयक तथा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांच्या नियोजनातून यशस्वी झालेल्या उपक्रमाला शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता परब यांनी शुभेच्छा दिल्या तसेच या उपक्रमामुळे जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांमध्ये नव चैतन्य पसरले असून आनंददायी आधुनिक विज्ञान अध्यापनाचा पाया रचला जात असल्याचे मत प्रमुख अतिथीने व विज्ञानप्रेमींनी गौरवोद्गारातून काढले.
कणकवली येथील कार्यशाळेच्या यशस्वी नियोजनासाठी तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, पृथ्वीराज बर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले.











