LIVE UPDATES

जलसमाधी आंदोलनप्रकरणी राजू शेट्टींसह 'मविआच्या ' नेत्यांवर गुन्हे

देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 07, 2026 13:39 PM
views 29  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मीठमुंब्री समुद्रकिनारी जलसमाधी आंदोलन केल्याप्रकरणी खासदार राजू (देवाप्पा अण्णाप्पा) शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह महाविकास आघाडीच्या विविध पक्षांच्या नेत्यांवर आणि आंबा बागायतदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात राजू शेट्टी, विनायक राऊत, साक्षी वंजारे, महादेव जानकर, आनंद ढोके, गणेश गावकर, गणेश वाळके, रामानंद वाळके, स्वप्निल तोडणकर, अजय नानेरकर, संजय आचरेकर, दिनेश धूवाळी, किरण टेंबुलकर, उमेश कुलकर्णी, सुशांत नाईक, प्रसाद दुखंडे, शरद परब, वैभव नाईक, विलास साळस्कर, रवींद्र जोगल, चंदन मेस्त्री, धीरज घाडी, धीरज परब, डॉ. मंगेश सावंत, राजेंद्र गड्याळ यांच्यासह अन्य संबंधितांचा समावेश आहे.देवगड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रवींद्र महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५, ३७(१)(ई), ३७(३) तसेच भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९० आणि २३३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प रद्द करावा तसेच आंबा बागायतदारांना वाढीव नुकसानभरपाई द्यावी, या मागण्यांसाठी मीठमुंब्री समुद्रकिनारी जलसमाधी आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असतानाही मोठ्या संख्येने जमाव एकत्र करून सरकारी आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवगड पोलीस करत आहेत.