घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून आशा भोसलेंना अनोखे अभिवादन

Edited by: संदीप देसाई
Published on: April 17, 2026 11:16 AM
views 16  views

बांदा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथील विद्यार्थ्यांनी आपल्या कोवळ्या हातांनी आणि भावनांनी भरलेल्या मनातून सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. पेन्सिलच्या साध्या रेषांतून साकारलेले हे स्केच पाहणाऱ्यांच्या मनाला थेट स्पर्श करून जाते. इयत्ता सातवीतील स्वप्नाली संजय गावडे व तिसरीतील स्वप्नील संजय गावडे या भावंडांनी अत्यंत तन्मयतेने हे चित्र साकारले. त्यांच्या प्रत्येक रेषेतून आशा भोसले यांच्याविषयीचा आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे जाणवते.

या विद्यार्थ्यांना गावडे कुटुंबीयांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या प्रोत्साहनामुळेच ही कलाकृती अधिक जिवंत आणि प्रभावी ठरली आहे. मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि संवेदनशीलता अधिक बळकट होते,” असे मत व्यक्त केले. यावेळी सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे व मुरलीधर उमरे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या छोट्याशा पण मनापासून केलेल्या प्रयत्नातून घारपी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘कलेतून व्यक्त होणाऱ्या भावना’ किती प्रभावी असतात, याचे सुंदर उदाहरण घालून दिले आहे.