वन्य प्राण्यांच्या उपद्रवाकडे लक्ष वेधण्यासाठी बांद्यात राष्ट्रीय महामार्ग रोखणार

सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाच्या बैठकित निर्णय | वाढत्या जंगलतोडीकडे दूर्लक्षाचे गंभीर परिणाम..?
Edited by:
Published on: January 04, 2026 15:50 PM
views 39  views

बांदा :  जिल्ह्यात नव्याने निर्माण झालेल्या हत्ती समस्या व वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाच्या वतीने तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. या समस्यांच्या निषेधार्थ तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या आठ दिवसांत बांदा येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको स्वरूपाचे जनआंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांना एकत्र आणून संयुक्त विचारविनिमय करून आंदोलनाची अंतिम तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाच्या सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी व वेंगुर्ला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीच्या बांदा येथील कार्यालयात उत्साहात पार पडली. या बैठकीस फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, कृषी शास्त्रज्ञ डॉ. मोहन दळवी (घोडगे), जिल्हा विद्युत निवारण मंचाचे अध्यक्ष संजय लाड (माडखोल), दोडामार्ग फळबागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई (कळणे), सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे संचालक नितीन मावळंकर (बांदा), झोळंबे दुग्ध सोसायटीचे चेअरमन नारायण गावडे, प्रगतशील काजू बागायतदार राकेश धर्णे (साटेली), दोडामार्ग फळबागायतदार संघाचे खजिनदार आकाश नरसुले (कुडासे), प्रगतशील शेतकरी अभय नांगरे (शिरवल), प्रदीप सावंत (केसरी), विष्णू सावंत (रोणापाल), बॉबी उर्फ अजित देसाई (सरपंच, कळणे), उल्हास परब (माजी सरपंच, मडूरा), दादू उर्फ गोविंद सावंत (देवसु) आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच शेतकरी संघातर्फे परदेश दौऱ्यावर जाणारे प्रगतशील युवा शेतकरी प्रणव नाडकर्णी (निरवडे), राजकीय युवा नेतृत्व मंगलदास देसाई (डेगवे), अमित सावंत (सरपंच, कुंब्रल), राजू पवार (वैभववाडी), गोपाळ करमळकर सर (पाडलोस), सज्जन नाईक (भाकरवाडी) यांच्यासह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत शेतकरी संघटनांतर्फे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शेतकरी उमेदवार उभे करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर संघटित लढा उभारण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. हत्ती व वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेती, फळबागा आणि मानवी जीवन धोक्यात येत असल्याने शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.