
सिंधुदुर्गनगरी : खून प्रकरणातील संशयित आरोपी भीम उर्फ कुत्तो धर्मादास मुजुमदार, वय 40 राहणार कुंभारवाडी कुडाळ मूळ राहणार पश्चिम बंगाल याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी बी गायकवाड यांनी 50 हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपीच्यावतीने अशपाक शेख यांनी काम पाहिले.
रानबांबुळी सीमरेवाडी येथील एका चाळीत राहत असलेल्या उत्तम काशीराम सरकार यांच्याशी संशयित आरोपी भीम मुजुमदार याचा मजुरीच्या पैशाच्या विषयावरून वाद झाला होता. यावेळी भीम याने उत्तम याच्या डोक्यावर व तोंडावर लोखंडी सळीने मारहाण केली होती. त्यात उत्तम बेशुद्ध झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. 24 सप्टेंबर 2024 रोजी रात्री आठ ते 11 या वेळेत ही घटना घडली होती.
याबाबत दाखल तक्रारीनुसार सिंधुदुर्ग नगरी पोलिसांनी संशयित आरोपी भीम मुजुमदार याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103 (1),238 नुसार खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. 1 जानेवारी 2025 रोजी पोलिसांनी संशयित आरोपीला याप्रकरणी अटक केली होती. सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयीताने जामीनसाठी केलेल्या विनंती अर्जावरील सुनावांत त्याची सशर्थ जामिनावर मुक्तता करण्यात आली.