LIVE UPDATES

अतुल काळसेकर उद्या विधानपरिषदेचा अर्ज भरणार का ?

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 31, 2026 23:54 PM
views 48  views

सिंधुदुर्ग | विधानपरिषदेच्या रायगड मतदार संघ महायुतीत कोणत्या पक्षाला सुटला हे अद्याप जाहीर झाले नसल्याने या जागेसाठी कोण उमेदवारी अर्ज भरणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या मतदार संघातून शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल आहे. त्यात आता भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर हे सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार का ? यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  


गेल्या काही आठवड्यांपासून या जागेसाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत होती. या मतदार संघात शिवसेना आणि भाजपाची ताकद आहे. त्यामुळे हा मतदार संघ आपल्यालाच मिळावा अशी मागणी शिवसेना आणि राष्ट्रवादिकडून करण्यात येत होती. तशी फिल्डिंग राष्ट्रवादीकडून लावण्यात आली होती. गल्ली पासून दिल्ली पर्यंत या जागेसाठी चर्चा सुरु होत्या. अद्याप हा मतदार संघ महायुतीत कोणत्या पक्षाला सुटला हे अधिकृत जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे महायुतीत इच्छुकामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

भाजपने या मतदार संघाबद्दल अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. मात्र, सिंधदुर्गात सहकार क्षेत्रातील प्रभाव, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मजबूत नेटवर्क आणि पक्षाशी कायमची निष्ठा असलेले अतुल काळसेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अतुल काळसेकर उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.