
वैभववाडी : कणकवली–वैभववाडी मार्गावरील एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनींना प्रवासा दरम्यान वाहकाने मधेच गाडीतून उतरविले. हा प्रकार १४ मार्चला घडला आहे. संबंधित वाहकांवर कारवाई करावी अशी मागणी पालक प्रमोद लोके यांनी विभागीय वाहतूक नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वैभववाडी तालुक्यातून शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी कणकवली येथे जातात. कणकवली -वैभववाडी हा प्रवास सवलत पास द्वारे एसटीतून हे विद्यार्थी करीत असतात. नेहमी प्रमाणे हे विद्यार्थी शनिवारी दुपारी वैभववाडीकडे परतत होते. दरम्यान नेहमीची कणकवली-मौदे बस काही कारणास्तव रद्द करण्यात आल्याचे बसस्थानकातून सांगण्यात आले. याचवेळी कणकवली फोंडा बोरीवली ही बस कणकवली बसस्थानकात आली. या बसमध्ये बसण्यापूर्वी या विद्यार्थ्यांनींनी चालकाची परवानगी घेतली. यानंतर ती बसमध्ये बसली. बस लोरे नं २ येथे आले असता वाहकाने या विद्यार्थ्यांनींना गाडीतून खाली उतरून लावले. हा प्रकार त्या विद्यार्थीनी घरी येऊन सांगितला. याप्रकरणी पालक श्री लोके यांनी विभागीय वाहतूक नियंत्रकांकडे तक्रार दिली आहे.
या घटनेमुळे आपल्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे श्री लोके यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच शाळा–महाविद्यालयीन मुलींना जबरदस्तीने एसटी बसमधून उतरवणे हा गंभीर प्रकार असून अशा बेजबाबदार वर्तन करणाऱ्या वाहकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.










