करुळ घाटात इथेनॉल टँकरचा अपघात

चालक जखमी, मोठी दुर्घटना टळली
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 17, 2026 10:43 AM
views 140  views

वैभववाडी  : करुळ घाटात सोमवारी (दि.१६) रात्री  ११ वाजण्याच्या सुमारास इथेनॉल वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला असून यात चालक जखमी झाला आहे. या अपघातानंतर टँकरमधून ज्वालाग्रही इथेनॉलची गळती सुरू झाल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.वैभववाडी व गगनबावडा पोलीस, अग्निशामक दल यांच्या अथक परिश्रमामुळे अनर्थ टळला.

 मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील वारणा येथून इथेनॉल घेऊन टँकर गोव्याकडे निघाला होता.दरम्यान करुळ घाटात टँकर आला असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटून तो रस्त्याकडेला पलटी झाला. अपघातानंतर चालकाचा पाय स्टेअरिंगखाली अडकून तो टँकरमध्येच अडकलेल्या अवस्थेत होता. त्याचवेळी टँकरमधील इथेनॉल बाहेर सांडून रस्त्यावर पसरत होता.या घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक, अग्निशामक दलाचे जवान तसेच गगनबावडा पोलिसांनी संयुक्तपणे मदतकार्य हाती घेतले. चालकाला बाहेर काढण्यासाठी क्रेन, जेसीबी आणि फायर ब्रिगेडची मदत घेण्यात आली.अथक प्रयत्नांनंतर चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. जखमी चालकाला  रुग्णवाहिकेतून वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

  दरम्यान, कोल्हापूर येथून आलेल्या अग्निशामक दलाच्या पथकाने इथेनॉलची गळती थांबवून योग्य ती खबरदारी घेतली. घटनास्थळी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हायवे पोलिसांकडून वाहतूक नियंत्रण करण्यात येत आहे. या बचावकार्यात पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस हवालदार संदीप कांबळे, पोलीस नाईक उद्धव साबळे, पोलीस शिपाई संदीप राठोड आदींनी सहभाग घेतला.