कुडाळमध्ये 'दावत-ए-इफ्तार' उत्साहात

धार्मिक एकोपा जपण्याचा 'सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन'चा निर्धार
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 17, 2026 11:22 AM
views 215  views

कुडाळ : पवित्र होळी आणि रमजान सणाचे औचित्य साधून 'सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन'च्या वतीने कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेला “दावत-ए-इफ्तार” सोहळा सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरला. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जातीय सलोख्याचा संदेश दिला.

सामाजिक कार्याचा गौरव

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचे एजाज नाईक यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. फाउंडेशनद्वारे आरोग्य क्षेत्रात केले जाणारे कार्य, तसेच मशीद आणि मदरसा परिसरात आयोजित केली जाणारी रक्तदान शिबिरे याबद्दल त्यांनी माहिती दिली. कोरोना काळात संस्थेने बजावलेल्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांनी उपस्थितांना होळी व रमजानच्या शुभेच्छा दिल्या.

अभय शिरसाट आणि धीरज परब: कुडाळमधील पूर्वापार चालत आलेला धार्मिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच कोरोना काळातील संस्थेच्या सेवाकार्याचा गौरव केला.

डॉ. अर्षद आवटे आणि विद्याप्रसाद बांदेकर: समाजात प्रेम आणि आदरभाव वाढवण्यासाठी असे कार्यक्रम गावागावात होणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, संजय भोगटे यांच्यासह नगरसेवक अभी गावडे, गणेश भोगटे, संतोष शिरसाट यांनीही आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

या सोहळ्याला डॉ. अल्फान आवटे, ॲड. परवेज नाईक, उल्हास शिरसाट, प्रकाश कुंटे, सुनील धुरी, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, राजू गवंडे, तसेच पत्रकार अजय सावंत, काशिराम गायकवाड, प्रसाद राणे आणि जयभीम युवक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर कुडाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. हाफिज नाझीम, मुश्ताक शेख, सज्जाद शेख, इक्बाल मेमन, जमीर पटेल, अनिक नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित पाहुणचार करून हा सोहळा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.