
कणकवली : नवीन कुर्ली वसाहत गावाच्या विकासासाठी साडेचार कोटी तसेच देवघर पाटबंधारे प्रकल्पासाठी ५० कोटींचा निधी त्यावेळी आमचे नेते जयंत पाटील हे जलसंधारण विभागाचे मंत्री असताना मंजूर झाला होता. आमचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून हा निधी मी मंजूर करून आणला होता.
मात्र, आतापर्यंत हा निधी खर्च झाला नव्हता.तर आता कामांना सुरुवात झाली असून ठेकेदार आपल्यला मर्जीने, सत्ताधारी गटातील काहींना हाताशी धरून कामे करत आहेत. सदर कामे चांगल्या दर्जाची व्हावी, यासाठी अधिकार्यांनी कुणाच्या दबावाखाली न येता कामे करून घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नवीन कुर्ली वसाहत येथील ग्रामस्थ तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कणकवकली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला.
आपल्या निवासस्थान आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पिळणकर म्हणाले, नवीन कुर्ली वसाहत होऊन ३६ वर्षे झाली. गेली १८ – २० वर्षे नवीन कुर्ली वसाहत विकास समितीचा अध्यक्ष या नात्याने व त्यापुढेही मी कार्यरत आहे. २०२२ साली जयंत पाटील जलसंधारण विभागाचे मंत्री असताना आमचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून साडेचार कोटींचा निधी तर ५० कोटी रुपये देवघर पाटबंधारे प्रकल्प कालव्यासाठी आले होते.
पण स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे निधी खर्च झाला नाही. यात अधिकार्यांवरही दबाव होता. तर तोच निधी खर्च करण्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे. पण, संबंधित अधिकार्यांनी कुणाच्याही दबावाखाली न येता सदर कामे निवीदेप्रमाणे होताहेत की काही लोकांच्या सांगण्याप्रमाणे? पक्षांतर्गत गटबाजीचा या कामावर परिणाम होतोय का? हे बघायला हवे.
पिळणकर पुढे म्हणाले, या कामांच्या टेंडरमध्ये २० ते २१ टक्के ' बिलो ' भरलेली आहेत, हे आम्हाला मान्य नाहीत. २१ टक्के 'बिलो' भरलेली असेल तर ठेकेदार कामाची काय 'क्वालिटी' देणार? परिणामी या कामांमध्ये दर्जा नाही. ठेकेदार मर्जीने कामे करत आहेत. धरणग्रस्तांची गळचेपी सुरु आहे. उपजिवीकेसाठी सुरु केलेली दुकाने बंद तोडण्याचा प्रकार सुरु आहे. पण, यावेळी सत्ताधार्यांना मात्र वेगळा न्याय दिला जात आहे. लोकांची दिशाभूल केली जात आहे. बाहेरचे लोक येऊन येथे सावकारी करत आहेत. काही लोक गावात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आरोपही पिळणकर यांनी केले.
नविन कुर्ली वसाहत होऊन ३५ वर्षे लोटली तर आवश्यक त्या १८ नागरी सुविधांची पूर्तताच झालेली नाही. म्हणूनच अधिकार्यांनी आता निधी खर्च होत असताना कामाच्या ठिकाणी स्वत: उपस्थित राहून पाहणी करावी. कारण, ही कामे अन्य कोणत्या फंडातून नव्हे तर पाटबंधारे विभागातून सुरु आहेत. हा निधी आमचे नेते जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना मंजूर झाला होता. पण, हा निधी पाटील यांनी मंजूर केलेला नसेल तर मग त्यांनी मंजूर केलेला निधी कुठे गेला व आता कोणता निधी खर्च केला जात आहे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, असेही पिळणकर म्हणाले.
गावात आम्हाला दिलेल्या पर्यायी रस्त्यांच्या सगळ्या पायवाटा झाल्या आहेत. मी स्व:खर्चाने रस्ते, गटारे, विहीरींची साफसफाई केली होती. त्यामुळे गावातील एकाच गटाचे म्हणे ऐकून ठेकेदार काम करत असेल तर ते आम्ही मान्य करणार नाही. आम्ही शंभर टक्के विरोध करू. अनेक वर्षांपासून गावात मंजूर झालेली कामे होऊ दिली नाही, हे दुर्दैव आहे. आम्हाला ठेकेदारी नव्हे तर गावात चांगले काम होण्याची अपेक्षा आहे. अधिकारी मंडळींनी दुजाभाव , पक्षपात, गटातटाचे राजकारण न करता मिळालेल्या निधीचा योग्य वापर करावा व कामे पूर्णत्वास न्यावीत. अन्यथा येत्या काळात मोठे आंदोलन करू, असेही पिळणकर म्हणाले.










