
कणकवली : तथागत गौतम बुद्धाने सांगितलेल्या मार्गाचे पालन करून जगातील लोक दु:ख मुक्त होत आहेत. त्यामुळेच गौतम बुद्ध हेच खऱ्या अर्थाने विश्वगुरू आहेत, असे मत भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी व्यक्त केले.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा, महिला शाखा, समता सैनिक दल, कणकवली तालुका शाखा यांच्यावतीने जानवलीच्या बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेचा प्रारंभ दिन कार्यक्रम झाला. याप्रसंगी श्री. कासार्डेकर बोलत होते. यावेळी समता दलाचे उपाध्यक्ष दिलीप तरंदळेकर, संजय कांबळे, संस्कार विभागाचे सचिव दीपक कांबळे, पर्यटन विभागाचे सचिव सुभाष जाधव, तालुका सचिव महेंद्र कदम, कोषाध्यक्ष प्रकाश कांबळे, महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रा. सुषमा हरकुळकर, सरपंच अजित पवार, जेनीकुमार कांबळे, विजय हरकुलकर, गोपी पवार, बाळा डांगमोडेकर, दीपक कदम, शंकर कदम यांच्यासह गाव शाखेतील बहुसंख्य महिला व पदाधिकारी उपस्थित होते.
आषाढी पौर्णिमेला बोधिसत्व चित्ताचे महामायेच्या उदरी संसाराने केले म्हणून त्याला गर्भ मंगल दिन म्हणतात. तसेच महाभिनिक्ष्क्रमण दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, संघाची स्थापना, वषार्वास प्रारंभ दिन अशा विषयांवर श्री. कासार्डेकर यांनी प्रवचनातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव संजय पेंदुरकर यांनी केले.












