LIVE UPDATES

न्यायव्यवस्था नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावते

अ‍ॅड. प्रशांत चिटणीस : सावंतवाडी तालुका वकील संघटने तर्फे "लेक्स डिस्कशन” व्याख्यानमालेचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 31, 2026 18:48 PM
views 40  views

सावंतवाडी : तालुका वकील संघटने तर्फे आयोजित "लेक्स डिस्कशन” ह्या व्याख्यानमालेतील दहावे पुष्प सावंतवाडी येथील दिवाणी न्यायालय येथे आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या दहाव्या पुष्पाचे प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध वकील अ‍ॅड. प्रशांत चिटणीस ह्यांचे व्याख्यान झाले. सदरच्या व्याख्यानाचा विषय "न्यायालयीन सतर्कता'' असा होता. व्याख्यानादरम्यान वक्त्यांनी न्यायिक सक्रियतेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. 

यावेळी सावंतवाडी वकील संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. कांबळे, जिल्हा महिला उपाध्यक्ष अ‍ॅड. नीता गावडे, अ‍ॅड. राघवेंद्र नार्वेकर, अ‍ॅड. परशुराम चव्हाण, अ‍ॅड. पंकज आपटे, अ‍ॅड. अभिषेक चव्हाण, अ‍ॅड. अलका कासकर, अ‍ॅड. प्रतीक्षा भिसे, अ‍ॅड. विनय गावडे, अ‍ॅड. स्वप्नील कोरगावकर, अ‍ॅड. राहुल मडगावकर, अ‍ॅड. वामन निर्गुण, इत्यादी वकीलवर्ग तसेच विधी विद्यालयाचे बहुतांश विद्यार्थी हजर होते. जेव्हा कायदेमंडळ आणि कार्यपालिका आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरतात, तेव्हा न्यायव्यवस्था नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावते आणि एखाद्या विषयासंदर्भात नवीन कायदा करणे संबंधी सूचना कार्ये किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यात बदल सुचवते यालाच 'न्यायालयीन सतर्कता' म्हणतात.

न्यायमूर्ती पी. एन. भगवती आणि व्ही. आर. कृष्णा अय्यर यांनी भारतात जनहित याचिकेच्या माध्यमातून या संकल्पनेचा पाया रचला, ज्यामुळे सामान्य माणसालाही न्यायालयात दाद मागणे सोपे झाले. वक्त्यांनी 'केशवानंद भारती' आणि 'मेनका गांधी' विरुद्ध भारत सरकार यांसारख्या महत्त्वाच्या खटल्यांचे उदाहरण देऊन संविधानाच्या मूळ संरचनेच्या रक्षणाचे महत्त्व सांगितले. न्यायालयीन सक्रियता ही लोकशाहीसाठी पोषक असली तरी, ती 'न्यायिक अतिरेक' ठरू नये, बर्याचवेळा न्यायालयीन सतर्कतेच्या नावाखाली न्यायालय कायदेमंडळ किंवा कार्यपालिका यांच्या अधिकारावर अतिक्रमण करताना दिसते यासाठी न्यायव्यवस्थेने स्वतःवर काही मर्यादा घालणे आवश्यक आहे, असेही वक्त्यांनी नमूद केले.

खरतर हा विषय खूपच किचकट आणि थोडासा जहाल विचारांचा. जहाल अशा करिता की हा विषय मांडताना कोणत्याही न्यायालयाची भिती बाळगता येणारी नसते. ना. सर्वोच्च न्यायालय तसेच ना. उच्च न्यायालय हे बऱ्याच वेळा स्वतःचा मोठेपणा किंवा आपल्या भाषेत टिमका मिरवण्यासाठी पूर्वीच अस्तित्वात असलेल्या कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्याचे सोडून त्याच विषयाकरिता नवीन कायदा तयार करण्याची गरज असल्याचे भासवतात. कायद्याच्याच भाषेत सांगायचं तर ज्युडिसियल ऍक्टिव्हिसम करून आपण समाजासाठी चांगले कायदे आणण्यासाठी विधिमंडळाला कसे भाग पाडले हा मोठेपणा मारतात. खरतर जे कायदे अस्तित्वात आहेत त्यांचा योग्य प्रकारे अवलंब केला तर समजात मोठी सुधारणा सहज शक्य आहे. हा विचार विविध न्यायनिवाड्यांचा संदर्भ देऊन अ‍ॅड. चिटणीस यांनी सगळ्या वकील वर्गाला आणि विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. त्यांच्या व्याख्यानामुळे सर्वांची में. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.

तद्नंतर चर्चासत्रामध्ये वकिलांच्या व विधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्याच्या विविध प्रश्नांची अ‍ॅड. चिटणीस यांनी उत्तरे दिली. अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांचे स्वागत वकील संघटनेच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. दिलीप नार्वेकर व सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळाजी बाबुराव रणशूर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंतवाडी वकील संघटनेचे उपाध्यक्ष (महिला) अ‍ॅड. सिद्धी परब व आभार प्रदर्शन सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळाजी रणशूर यांनी केले.