
'त्या' इमारतीतील नागरिकांची घेतली भेट
सावंतवाडी : न्यू सबनिसवाडा येथील टीचर कॉलनी सोसायटी बांधकामास संबंधित बिल्डरला दिलेली परवानगी ही प्रशासकीय काळातील असून बिल्डरकडून येथील नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप केला गेला आहे. ओसी कशी मंजूर केली हा रहिवाशांचा प्रश्न असून प्रशासकीय काळातील कामकाजाची चौकशी लावणार असा इशारा नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी दिला. आज सायंकाळी येथील नागरिकांची भेट घेत त्यांनी धीर दिला.
नगराध्यक्षा सौ. भोंसले म्हणाल्या, बिल्डरने फसवणूक केल्याने पाण्याची गैरसोय नागरिकांची आहे. नगरपरिषदेच पाणी कनेक्शन टाकीत सोडत तीच विहीर असल्याची फसवणूक संबंधितांने केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. तसेच प्रशासकीय काळात दिलेल्या परवानगीबाबत लक्ष वेधले असून या काळातील कामकाजाची चौकशी करून जर दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, लहान मुलांना पाणी मिळत नसल्याने अनेकांचे आरोग्य बिघडले आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून उद्याच त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय नगरपरिषदेकडून करून देऊ असा विश्वास पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, सभापती सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, प्रतीक बांदेकर, सुनिता पेडणेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले आदींसह न्यू सबनिसवाडा येथील टीचर कॉलनी सोसायटी रहिवासी उपस्थित होते.











