LIVE UPDATES

'इको सेन्सिटिव्ह झोन'च्या अधिसूचने विरोधात हरकती नोंदवा

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 24, 2026 18:17 PM
views 38  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : केंद्र शासनाकडून २७ जुलै रोजी सावंतवाडी नगरपरिषद हद्दीसाठी प्राप्त झालेल्या 'इको सेन्सिटिव्ह झोन'च्या अधिसूचनेला विरोध दर्शवण्यासाठी शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले आहे. नगरपरिषद हद्दीत हा झोन लागू झाल्यास भविष्यात कोणत्याही प्रकारच्या नवीन बांधकामांना परवानगी मिळणार नसून विकास प्रकल्प, व्यवसाय, पायाभूत सुविधांच्या कामात अनेक बंधन येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर म्हणाले, अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषदेने १४ ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या एकमताने 'इको सेन्सिटिव्ह झोन' सावंतवाडी शहरासाठी कसा बाधक आहे, याविषयीचा स्पष्ट विरोध दर्शवणारा ठराव मंजूर केला आहे. नगरपरिषद हद्दीत हा झोन लागू झाल्यास भविष्यात कोणत्याही प्रकारच्या नवीन बांधकामांना परवानगी मिळणार नाही. नवीन विकास प्रकल्प, व्यवसाय अथवा पायाभूत सुविधांचे काम हाती घेता येणार नाही. यामुळे शहरातील विकासकामांवर विपरीत परिणाम होऊन नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल.

 नगरपरिषदेने १४ ऑगस्ट रोजी घेतलेल्या ठरावाला पाठबळ देण्यासाठी शहराच्या विकासाच्या दृष्टीने नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. यासाठी 'मुख्याधिकारी, सावंतवाडी नगरपरिषद' यांच्या नावाने किमान २ ते ३ हजार हरकती नागरिकांनी नोंदवाव्यात, या सर्व हरकती आणि प्रशासकीय कागदपत्रे केंद्र शासनाकडे पाठवून हा झोन रद्द करण्याची मागणी अधिक सक्षमपणे मांडता येईल, असे उपनगराध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.