
महाराष्ट्रात कुठेही काम मिळू देऊ नका ; ठेकेदारावर संताप
सिंधुदुर्गनगरी : वैभववाडी पंचायत समितीतील बांधकाम, लघू पाटबंधारे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग हे केवळ कागदोपत्री सुरू असून प्रत्यक्षात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे तालुक्यातील विकासकामांचा पूर्ण बोजवारा उडाला आहे, असा गंभीर आरोप करत जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत सदस्य प्रमोद रावराणे यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. “जर कर्मचारीच द्यायचे नसतील तर हे विभाग बंद करा; आम्ही थेट जिल्हास्तरावर येऊन कामे करून घेऊ,” अशा संतप्त शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती संतोष साटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. समिती सचिव तथा कार्यकारी अभियंता (बांधकाम) राजेंद्र सावंत, सदस्य संदेश सावंत, दीपक नारकर, सुदन कवठणकर, संजय बोंबडी, रुपेश कानडे, प्रमोद रावराणे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सभेत बोलताना रावराणे यांनी वैभववाडी तालुक्यावरील “दुजाभाव” अधोरेखित केला. “इतर तालुक्यांमध्ये अधिकारी उपलब्ध आहेत, मग वैभववाडीच कायम रिक्त पदांच्या छायेत का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी बांधकाम विभागातील उपअभियंत्याचे पद रिक्त असल्याचे सांगितले. लघू पाटबंधारे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातही अनेक पदे रिक्त असून काही अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला असला तरी ते प्रत्यक्ष तालुक्यात फिरकत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
“अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रत्येक कामासाठी ओरोसला धाव घ्यावी लागते. त्यामुळे गावोगावी विकासकामे रखडली आहेत. प्रशासनाने वैभववाडी तालुक्याला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे,” असा घणाघात त्यांनी केला. त्यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
ठेकेदारावर सभागृह संतप्त
सभेत ठेकेदार निखिल घेवारी याच्याविरोधातही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वैभववाडी तालुक्यातील अनेक कामांचे ठेके घेतल्यानंतरही प्रत्यक्षात कामांना सुरुवात झाली नसल्याचा आरोप सदस्य प्रमोद रावराणे यांनी केला. कुसूर आणि वेंगसर गावांतील पाणीपुरवठा कामे रखडल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराला तब्बल २५ लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले असूनही प्रत्यक्ष कामाची प्रगती शून्य असल्याची बाब सभेत समोर आली. यानंतर सर्व सदस्यांनी संताप व्यक्त करत संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. “या ठेकेदाराला महाराष्ट्रात कुठेही काम मिळू नये,” असा ठरावच सभेत घेण्यात आला.
रोड रोलर चोरी प्रकरण पुन्हा चर्चेत
कुडाळ पंचायत समिती आवारातील रोड रोलर चोरी प्रकरणाचाही सभेत उल्लेख झाला. या प्रकरणी काही कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली असली तरी “या प्रकरणामागील खरे सूत्रधार कोण आहेत, हे शोधले गेले पाहिजे,” अशी मागणी सदस्य संदेश सावंत यांनी केली. “झारीतील शुक्राचार्य शोधून त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे ते म्हणाले. तसेच दोषींवर ठोस कारवाई होईपर्यंत हा विषय सभेच्या विषयपत्रिकेवर कायम ठेवण्याची मागणीही त्यांनी केली.











